
सोलापूर : पंढरपुरात जीपच्या धडकेने जखमी झालेल्या महिलेस पंढरपूर तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे मदत झाली. अपघातग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी ठाणे अंमलदाराची जबाबदारी सांभाळाली.
पंढरपुरातील तीन रस्ता चौकात गुरुवारी रात्री पावणे आठ वाजता जिपने दुचाकीवरून निघालेल्या महिलेस ठोकरले. यात ती महिला व पाठीमागे बसलेला मुलगा रस्त्यावर जोरात पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जीपचालक जीपसह तसाच पुबे निघून गेला. घटनास्थळी असलेल्यानी थेट पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना संपर्क केला. मुजावर यांनी तात्काळ ठाणे अंमलदार देशमुख व फौंजदार वडणे यांना मदतीसाठी पाठविले व जखमीना उपचारासाठी मदत करावी अशी तेथील लोकांना सूचना केली. घटनास्थळी असलेल्या किरण लोंढे याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. वेळेत हालचाली झाल्याने जखमी महिलेस मदत झाली. जखमींना मदत करणाऱ्या लोंढे याचे पो. नि.मुजावर यांनी कौतुक केले. तसेच त्यांची टीम अपघाताची परिस्थिती हाताळून परत येईपर्यंत ठाणे अंमलदाराची जबाबदारी त्यांनी सांभाळली.