“हाती टाळ,मुखी विठ्ठल आणि ओंजळीत हरित भविष्य” माध्यमिक शिक्षण विभागाचा उपक्रम

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आषाढी वारीच्या निमित्ताने जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना एक लाख सीडबॉलचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा व्यापक संदेश जनमानसात पोहोचविणाऱ्या या अभिनव उपक्रमाला वारकरी, नागरिक आणि उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
“हाती टाळ, मुखी विठ्ठल आणि ओंजळीत हरित भविष्य” या प्रेरणादायी संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे प्रत्येक वारकऱ्याच्या हातात भविष्यातील एका वृक्षाचे बीज देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येक सीडबॉलमध्ये विविध वृक्षांची बियाणे समाविष्ट करण्यात आली असून, वारकऱ्यांनी प्रवासादरम्यान मोकळ्या जागेत सीडबॉल टाकल्यास पावसाच्या पाण्यामुळे त्यातून वृक्ष उगवून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीस हातभार लागणार आहे. वारीसारख्या लोकचळवळीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश लाखो भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला आहे.
या उपक्रमाची संकल्पना व प्रेरणा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पर्यावरणप्रेमी व दूरदृष्टीपूर्ण विचारातून साकार झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंग्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला. यावेळी बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांनी शिक्षणासोबतच पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही केवळ मोहीम न राहता लोकचळवळ बनली, तर भावी पिढ्यांसाठी समृद्ध, सुरक्षित आणि संतुलित पर्यावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. शिक्षक व संघटनांचे प्रतिनिधी 28 जुलैपर्यंत पालखी मार्ग, पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंट, मंदिर परिसर, रेल्वे स्थानक, बस स्थानक, 65 एकर वारकरी निवास परिसरात फिरून वारकऱ्यांच्या हाती हे सिडबॉल देणार आहेत. सुमारे दहा लाख सीडबॉल या उपक्रमातून वाटप करण्यात येणार आहेत.



