डॉ. मिलिंद शहा यांचे जपानमध्ये होणार व्याख्यान
सोलापूर : ६ ते ९ ऑक्टोबर रोजी जपानची राजधानी टोकियो येथे “पॅरिनेटल मेडिसिन’ या विषयावर परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये सोलापुरातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. मिलिंद शहा यांना व्याख्यानासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे.
गरोदरपणात होणारे विविध संसर्ग मातेसाठी व बाळासाठी हानिकारक ठरु शकतात. हा संसर्ग टाळायचा कसा किंवा झालाच तर काय करता येईल यावर जगभरातील स्त्रीरोगतज्ञांना व बालरोग तज्ञांना डॉ. मिलिंद शहा या परिषदेत मार्गदर्शन करतील.डॉ. मिलिंद शहा सोलापूर व मुंबई येथे गेली जवळजवळ तीस वर्षे कार्यरत आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ते आपली सेवा देतात. त्याचबरोबर फॉग्सी आयसोपार्ब, आय. एम. ए. अशा विविध संस्थांवर अध्यक्ष व विविध पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. आजवर जवळजवळ तीस देशांमध्ये त्यांनी स्त्रीरोग शास्त्रावरील विविध विषयांवर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, चिली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जपान, थायलँड, साऊथ आफ्रिका, चीन, पोर्तुगाल, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, आफगाणिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया , व्हिएतनाम, तैवान, इंडोनेशिया, मॉरिशस, फिलिपाईन्स, दुबई, सार्बिया, ब्राझील, साऊथ कोरिया, पेरु इत्यादी देशांचा समावेश आहे. सोलापूरातील डॉक्टराला मिळालेल्या या बहुमानामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.