
सोलापूर : गेल्या दहा वर्षात दक्षिण सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अनेकांनी मला तिकीट मिळणार नाही अशा अफवा उठविल्या. मी निवडून येणार नाही असाही दावा केला गेला. विरोधकांनी माझ्यावर अनेक आरोप केले. या सर्व बाबींचा मी आता अभ्यास करीत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
दक्षिण सोलापूरच्या आमदारपदी सर्वाधिक तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेकडून सत्कार करण्यात आला. प्रारंभी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी व सल्लागार अमोगसिध्द लांडगे यांच्याहस्ते आमदार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती डॉ. चनगोंडा हविनाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हनुमंत कुलकर्णी,सरचिटणीस यतीन शहा उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले, मी निवडणुकीत कोणावरही टीका-टिप्पणी केलेली नाही. मी केलेल्या विकास कामाचा प्रचार केला.गेल्या दहा वर्षात मतदारसंघातील वीज, रस्ते, पाणी, आरोग्य हे मूलभूत प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडविल्यामुळे जनतेने मला विक्रमी मतांनी निवडून दिले आहे.येणाऱ्या काळातही तालुक्यातील सिंचन प्रश्न सुटण्यासाठी सीना- भीमा जोडकालवा, वडापूर येथे बॅरेजेस, तालुक्यात नवीन कालवे तसेच मंद्रूप येथे एमआयडीसी,गावोगावचे प्रलंबित पाणी प्रश्न, आरोग्य समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदारसंघात ठळक दिसेल असे काम करणार आहे. येणाऱ्या काळात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा राज्यातच आदर्श ठरेल असे काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पत्रकारांनी वास्तवतेचे भान ठेवून विकास कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जाण नसलेल्या लोकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना महत्त्व देणे टाळणे गरजेचे आहे. तालुक्याचे विकासाचे प्रश्न मांडल्यावर यातून दिशा मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे, प्रशांत कटारे, नितीन वारे, शिवराज मुगळे, दिनकर नारायणकर,बालाजी वाघे, गिरमल्ला गुरव,बबलू शेख, अशोक सोनकंटले, महेश पवार, आरिफ शेख, शिवय्या स्वामी,अप्पू देशमुख, बनसिध्द देशमुख, आनंद बिराजदार उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिजीत जवळकोटे यांनी केले.
पदाची नाही अपेक्षा…
मी कधीही पदाचा मोह केला नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली. येणाऱ्या काळात पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन,असे आमदार सुभाष देशमुख यांनी मंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.