
सोलापूर : आमच्या दोन पिढ्या पाण्याच्या प्रतीक्षेत गेल्या. आता तिसरी पिढीही प्रतीक्षेतच आहे. तिसर्या व भावी पिढीसाठी तरी कॅनॉलद्वारे पाणी सोडून त्यांच्या जीवनात आनंद फुलवा, अन्यथा 55-60 वर्षांपूर्वी कालव्यासाठी संपादित केलेल्या आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, अशी आक्रमक भूमिका शेतकर्यांनी घेतल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर तलावातून रामपूर, कर्देहळ्ळी, तोगराळी गावासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी पी.एम. बाबा यांनी दिले.
रामपूर तलावाशेजारील महादेव मंदिरात रामपूर लघु पाटबंधारे तलावातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याकरिता गुरुवारी आयोजित केलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते. परंतु पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर शेतकरी शांत झाले व बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस सहायक अभियंता आर.एम. वाघचवरे, कालवा निरीक्षक सिध्देश्वर नागणसुरे, ए.एस. पवार, महादेव पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष महांतेश बिराजदार यांच्यासह नानासाहेब सावंत, कर्देहळ्ळीचे उपसरपंच अशोक माने, उद्योजक भरत माने, दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते कृष्णात पवार, भारत शिंदे, मारुती जाधव, श्रीशैल माळी, दत्ता कांबळे, राम माने, नागेश पौळ यांच्यासह रामपूर, शिर्पनहळ्ळी, वडगाव, कर्देहळ्ळी व तोगराळी येथील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला राम जाधव, बापू पौळ, मारुती कदम व अन्य लाभधारक शेतकर्यांनी पाणी सोडणार नसाल तर कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनी परत देण्याची मागणी करीत अधिकार्यांना बोलण्यास मज्जाव केला. तसेच पाणी सोडण्यात येणारे दरवाजे कायमस्वरूपी बंद केल्याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी बाबा यांनी आता बंद दरवाजे मोकळे करून येत्या चार दिवसात कालव्याला पाणी सोडू, असे आश्वासन दिल्याने संतप्त झालेले शेतकरी शांत झाले.
चार दिवसात पाणी सोडणार
रामपूर, कर्देहळ्ळी व तोगराळी गावच्या हद्दीतील शेतकर्यांची मागणी विचारात घेता येत्या चार दिवसांत त्या भागाला कालव्याद्वारे साडेपाच किलोमीटर अंतरापर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या कालवा दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून ते काम तीन दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दुरूस्तीचे काम होताच चौथ्या दिवशी पाणी सोडले जाईल. यासाठी शेतकर्यांनी पाणी मागणीचे अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी पी.एम. बाबा यांनी दिले.
लाभधारक गावातील सरपंचांची उदासीनता
गेल्या अनेक वर्षांनंतर रामपूर तलावातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने आयोजित केलेल्या बैठकीसाठी रामपूर, वडगाव, शिर्पनहळ्ळी, कर्देहळ्ळी, तोगराळी, दिंडूर व धोत्री परिसरातील लाभधारक शेतकर्यांसह त्या त्या गावच्या सरपंचांनाही उपस्थित राहण्याबाबत सूचना दिली होती. परंतु पाणी सोडण्याचा महत्त्वाचा विषय असतानाही सर्वच गावच्या सरपंचांनी बैठकीकडे पाठ फिरविली. एकूणच शेतकर्यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होत असताना त्याविषयी सर्वच गावच्या सरपंचांची उदासीनता दिसून आली.