
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून महामार्गाचे जाळे निर्माण होत असताना भरपाई ज्यादा मिळावी म्हणून अनेकांनी वेगवेगळ्या शक्कल लढवल्याचे यापूर्वीच पहावयास मिळाले आहे. आता महावितरणने यावर पाऊल ठेवत प्रस्तावित महामार्गाच्यामध्येच उच्च दाबाची लाईन टाकण्याचे नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
- राष्ट्रीय महामार्ग विभागाने मोहोळ ते मंद्रूप हा बाह्यवळण मार्ग मंजूर केला आहे. या कामाच्या निविदेला मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बाह्यवळण मार्गाचे काम केव्हाही सुरू होऊ शकते अशी परिस्थिती आहे. असे असताना महावितरणने चक्क उच्च दाबाची लाईन महामार्गाच्यामधूनच टाकण्याचे काम सुरू केले आहे. मंद्रूप ते तेरामैल (बसवनगर) दरम्यान ही लाईन टाकण्यात येत आहे. ही लाईन टाकण्यासाठी काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पोल उभारण्यात येत आहेत. खाजगी ठेकेदारामार्फत हे काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ठेकेदारांनी घाईगडबडीत पोल उभे करण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. पोलीस उभारताना सिमेंट- खडीचे मिश्रण किती वापरायचे याचेही परीक्षण करण्यात आल्याचे दिसून येत नाही. खांब उभारण्यात आल्यानंतर जमिनीवर एक फुटाचा सिमेंट- खडी मिक्सचा बॉक्स करणे गरजेचे असतानाच घाईगडबडीत हे खांब रोवण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. मंद्रूप पाणीपुरवठा योजना तयार झाली आहे. सुमारे सव्वा कोटी थकबाकी असल्यामुळे महावितरणने या नवीन योजनेला कनेक्शन दिलेले नाही. ग्रामपंचायतने हे वीजबिल भरल्यानंतर कनेक्शन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सध्या ग्रामपंचायतीची बिल भरण्याची ऐपत नाही. पण त्यासाठीच ही उच्च दाबाची लाईन टाकण्यात आली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ही लाईन टाकताना प्रस्तावित महामार्गाच्या हद्दीबाहेर काम करणे गरजेचे असताना महामार्गाच्या मधोमध खांब उभारण्यात आले आहेत. महामार्गाचे काम सुरू झाल्यावर पुन्हा अडचणी निर्माण होत होणार आहेत. महामार्ग विभागाला पुन्हा महावितरणला भरपाई द्यावी लागणार आहे. महामार्ग विभागाची परवानगी न घेताच हे काम सुरू केले असल्याची चर्चा आहे.