‘या” कारणासाठी होणार सोलापूर जिल्ह्यातील मंदिराची स्वच्छता

सोलापूर : जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीत संपूर्ण स्वच्छता (डिप क्लिनिंग) मोहिम दि.१६ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व मंदिरांची मोहिम स्वरुपात स्वच्छता करणेत यावी. मंदिरांच्या परिसराची स्वच्छता करावी. ग्रामपंचायतींनी स्वनिधी किंवा दानशुर व्यक्ती यांची मदत घेऊन मंदिराला विद्युत रोषणाई करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या सीईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत.
जिल्हयात सर्व मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हयातील प्रमुख मंदिरांना विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन स्वच्छतेची पहाणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. प्रत्येक गावासाठी एका नोडल अधिकारी यांची निवड करावी. त्या नोडल अधिकारी यांनी प्रत्यक्ष जावून मंदिराची स्वच्छतेची पहाणी करावी अशा सूचना दिल्या आहेत.
या मोहिमेची सुरुवात महास्वच्छता अभियानाने झाली असून संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत. संपुर्ण जिल्हयात ग्रामीण भागामध्ये स्वच्छता सप्ताह दि १६ ते २२ जानेवारी या कालावधीत मंदिर व धार्मिक स्थळे स्वच्छता उपक्रम (डीप क्लीनींग ड्राईव्ह) राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व मनुष्यबळ व यंत्रणांचा सहभाग घेवून मोठया प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये गावातील रस्ते.जिल्हा व तालुकामार्ग रस्ते, महामार्गा बाजूचा कचरा व प्लास्टिक बाॅटल्स,प्लेटस, सिंगल युज प्लास्टिक जमा करुन स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच गावातील गल्लीबोळातील कचरा काढणे, गटारे व नाल्यांचे प्रवाह प्रवाहित करुन नाल्यांचा परिसर स्वच्छ करणेत येणार आहे. सार्वजनिक शौचालये, प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता करुन निर्जंतुकीकरण करणे तसेच गावातील अनाधिकृत फलक व बेवारस वाहने पाठविण्यात येणार आहेत. सार्वजनिक भिंती स्वच्छ करुन त्यावर स्वच्छताविषयक कलात्मक संदेश टाकेत येणार आहेत. ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणांवर दर्शनी भागामध्ये जनजागृतीपर संदेश माहिती रेखाटून त्या सुंदर करणे अशी कार्यवाही करण्यात येणार आहे
सर्व तालुक्यातील शहरालगतच्या पाचशे मीटर पंर्यतच्या हद्दीतील ग्रामपंचायती शहरांच्या हद्दीतील कचरा टाकतात. त्या भागातील नियमीत संपूर्ण स्वच्छता करण्याबाबत कार्यवाही करणेत येणार आहे. 8 जानेवारी रोजी जिल्हयामध्ये महास्वच्छता अभियानाची सुरूवात झालेली आहे. त्या अनुषंगाने आठवडयातील एक दिवस प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये वार्ड निहाय पथके तयार करून स्वच्छता करण्यात येणार आहे. उघडयावर कचरा टाकण्या-यावर सी.सी.टी व्ही मार्फत ग्रामपंचायतीने नियंत्रण ठेवून कारवाई करणेत येणार आहे. तसेच सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत दुकानदारवर यांचेवर कारवाई करणेत येणार असल्याचे सीईओ मनिषा आव्हाळे यांनी सांगितले.
संपूर्ण स्वच्छता अभियानाबाबत गावपातळीवरील व्हॉटस ॲप ग्रुप,स्थानिक वृत्तपत्रे व चॅनेल, दवंडी व नोटीस देऊन व गावामध्ये सर्व दर्शनी भागात फ्लेक्स लावून प्रसिद्धी व जनजागृती करावी या संपुर्ण स्वच्छता अभियान जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.