
सोलापूर : काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात जनतेची फसवणूक केली. कायम जातीपातीचे राजकारण केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात तर वाळू माफीयांचा धुमाकूळ होता. त्यामुळेच २०१४ मध्ये जनतेने त्यांना सत्तेच्या बाहेर फेकले. त्यानंतर आमदार झालेल्या सुभाष देशमुख यांनी वाळू माफी यांना संपविले. मोदी सरकारने आणलेली अनेक विकासकामे केली. लोकांना विश्वासात घेऊन विविध योजना राबवल्या. या काळातील लोकांना या योजनेचा लाभ दिला. सगळीकडे रस्ते करून तालुक्याला विकासाची वाट मोकळे करून दिली आहे, असा दावा आमदार राम सातपुते यांनी केला.
महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि आ. सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दक्षिण तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध गावांना भेटी देत मोदी सरकारच्या योजना लोकांसमोर मांडल्या. तसेच पुढील भविष्यासाठी भाजपला निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार राम सातपुते यांनी नांदणी, टाकळी, बोळकवठा, कुरघोट, हत्तरसंग कुडल, माळकवठे, कारकल या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी भंडारकवठे येथे सभा घेतली.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदार संघातून राम सातपुते यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार केला. यावेळी राम सातपुते म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकासकामे केली आहेत. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्येक मतदारसंघाला भरपूर विकासनिधी दिला आहे. दक्षिण तालुक्यात जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यात आमदार सुभाष देशमुख यशस्वी झाले आहेत. 2014 पूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात काय होते? सगळीकडे वाळूमाफीयांचे राज्य होते. रस्त्यांची वाट लागली होती. जनतेच्या कामांकडे पाहण्यास कोणी वाली नव्हता. सुभाष देशमुख आमदार झाल्यावर त्यांनी वाळू माफियांना मोडीत काढले. दक्षिण सोलापूर तालुक्यात चकाचक रस्ते केले. त्यामुळे आज जनतेला विना त्रास कोठेही जाता येते. जनतेचा आमदार काय असतो हे त्यांनी दाखवून दिले. आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेच्या खासदाराला निवडून द्या. या पुढीलकाळात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांकरिता आपण कटिबद्ध आहोत असा शब्द सातपुते यांनी यावेळी दिला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, डॉ. चनगोंडा हवीनाळे, संदीप टेळे, आप्पासाहेब पाटील, अंबिका पाटील जगन्नाथ गायकवाड, हणमंत कुलकर्णी, हनुमंत पुजारी, यतीन शहा, सोमनिंग कमळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.