संजय बाणूर यांच्यावर दोन दिवसात होणार कारवाई
सोलापूर :माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराच्या विरोधात शिक्षक भारती संघटनेने केलेल्या उपोषणाची दखल घेत झेडपी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन लिपिक संजय बाणूर यांच्या विरोधात सादर केलेल्या पुराव्याची खातरजमा केल्यानंतर दोन दिवसात कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी दिल्याचे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित काटमोरे यांनी सांगितले.
शिक्षक भारती संघटनेच्यावतीने मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनापासून माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधात चार दिवसाचे उपोषण करण्यात आलेले होते. उपोषणातील प्रमुख मागणीत माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन कनिष्ठ लिपिक संजय बाणूर यांच्यावर कारवाई करण्याबाबत लेखी आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आलेले होते. उपोषणास एक महिना होऊनही अद्याप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून संजय बाणूर यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे याबाबत गुरुवार दि. 5 ऑक्टोबर रोजी शिक्षक भारती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यावतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना निवेदन देऊन संबंधितावर तात्काळ कारवाई करणेबाबत मागणी करण्यात आली.
यापूर्वीच्या बैठकीतही संघटनेच्यावतीने काही पुरावे सादर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आजही काही पुरावे लेखी स्वरूपात अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आले. यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये संजय बाणूर यांच्या विरोधात निश्चितपणाने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिले.
यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, सचिव सुरेश कणमुसे, कार्याध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष रियाजअहमद अत्तार, कोषाध्यक्ष राजकुमार देवकते, करमाळा तालुकाध्यक्ष व संघटनेचे प्रवक्ते विजयकुमार गुंड, शहराध्यक्ष (प्राथमिक) देवदत्त मिटकरी, शहर सचिव नितीन रुपनर, सोलापूर शहराध्यक्ष (माध्यमिक) उमेश कल्याणी, जिल्हा संघटक शरद पवार, अमोल तावसकर, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील व तिपन्ना कोळी, भगवंत देवकर, भगवान कदम, योगेश टोणपे, महिला आघाडी प्रमुख पल्लवी शिंदे, नसीमबानो अन्सारी, यास्मिन अन्सारी, आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.