अक्कलकोट गटशिक्षणाधिकारीपदाच्या खुर्चीसाठी रंगली स्पर्धा
राजकुमार सारोळे
सोलापूर : अक्कलकोट गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभारासाठी कोणाची वर्णी लागणार? यावरून विस्तार अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप कोणाचीही अधिकृतरित्या नियुक्ती केलेली नसताना अक्कलकोट तालुक्यात सोशल मीडियावर मुख्यालयातील एका अधिकाऱ्याचे नाव आल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.
अक्कलकोटच्या गटशिक्षणाधिकारी कुद्शिया शेख या सप्टेंबरअखेर सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे त्यांचा पदभार कोणाकडे द्यायचा याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. अक्कलकोट तालुक्यात सद्यस्थितीत हरीश गायकवाड आरबळे, दयानंद कवडे, वाले हे चार विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. या चारही जणांची नावे पदभार देण्यासाठी कळवण्यात आली होती. यातील एका विस्तार अधिकाऱ्याचे नाव गटशिक्षण अधिकाऱ्याचा पदभार देण्यासाठी कळवावे असे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यावरून शिक्षण विभागातून गायकवाड, आरबळे की आणखी कोणाचे नाव जाणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. अशात गेल्या तीन दिवसापासून मुख्यालयातच कार्यरत असलेल्या विस्तार अधिकारी रतिलाल भुसे यांची नियुक्ती झाल्याची अभिनंदनची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांनी भुसे यांना विचारणा केल्यावर माझीच टिप्पणी तयार झाली असल्याचे त्यांनी सांगितल्यावर तालुक्यातील शिक्षण विभागातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव सुरू झाला. पण याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांना विचारल्यावर त्यांनी अद्याप गटशिक्षणाधिकाऱ्याचा पदभार कोणाकडेही दिला नसल्याचे स्पष्ट केले. यावर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारीपदाचा तात्पुरता पदभार कोणाला मिळणार हा अक्कलकोट तालुक्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे. तालुक्यात चार विस्तार अधिकारी असताना मुख्यालयातील अधिकारी आयात का करणार? असाही सवाल शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. तर काही जणांनी हा पदभार मिळावा म्हणून राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केल्याचे दबक्या आवाजात सांगितले जात आहे.