सोलापुरात ‘ताईं”कडे बहिणीचे आठ हजार अर्ज

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेतून महिन्यासाठी दीड हजार रुपये मिळवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बहिणीने अंगणवाडी ताईंकडे आठ हजार अर्ज दाखल केले आहेत.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतील. त्याची सुरुवात १ जुलैपासून झाली.महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने ३ जुलै 2024 रोजी राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनांचे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 28 जून 2024 रोजी मंजूर करण्यात आले. पूर्वी या योजनेत 21 ते 60 वयापर्यंतच्या महिलांना लाभ दिला जात होता. विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिला, परित्यक्ता महिला, निराधार महिला या योजनेत सहभागी होऊ शकत होत्या.
सुधारित पात्रता
आता वयोगट 21 ते 65 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अविवाहित महिलांनाही या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला जी पूर्वी या योजनेत सहभागी नव्हती, तीही आता या योजनेत लाभार्थी म्हणून पात्र ठरणार आहे. अंगणवाडीत अंगणवाडी ताईंकडे या अर्जांचे स्वीकृती करण्यात येत आहे. विहित नमुन्यातील हे अर्ज स्वीकारून ऑनलाइन अपलोड केल्यावर अंगणवाडी ताईलाही पन्नास रुपये प्रति अर्ज मानधन मिळणार आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत आठ हजार अर्ज अंगणवाडीत दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी शुक्रवारी दिली. जिल्हास्तरावर हे अर्ज मंजूर करण्याच्या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत तर तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना हे अधिकार मिळणार आहेत. अर्ज स्वीकारून त्याची छाननी करून मंजूर झालेली प्रकरणे जिल्हास्तरावर एकत्रित करण्यात येणार आहेत. त्याचे प्रशिक्षण सहभागी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.