
सोलापूर: सोलापूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी सोमवारी पंढरपूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासाठी त्यांनी कौठाळी, शिरढोण, वाखरी, गादेगाव, गोपाळपुर, मुंडेवाडी, कोंडारकी, चळे, आंबे, रांजणी, शिरगाव, ओझेवाडी आदी गावात भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या, या मतदारसंघात आजपर्यंत भाजपचे पाच खासदार झाले, दहा वर्ष केंद्रात, राज्यात सत्ता आहे. पण सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले नाहीत की एकही विकासयोजना आणली नाही. शेतकरी हा देशाचा कणा असून शेतकऱ्यांना हमी भाव नाही. खते बी बियाणांच्या दरात प्रचंड वाढ झाली. GST लावून इंधन दरवाढ करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. पीक विमा मिळत नाही. दुधाला दर नाही. पाण्याचे नियोजन नाही. नदीत पाणी आले की लाईट बंद करतात, अनेक गावात रस्ते नाहीत, अनेक गावात बस येत नाही. उज्वला योजनेच्या नावाखाली गरीबांना फसविले जात आहे. महागाई बेरोजगारी वाढली आहे, दहा वर्षे फक्त जनतेची दिशाभूल केली आहे. मोठ्या मोठ्या जाहिराती करून विकासाचे खोटे चित्र रंगविले जात आहे, मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने फसविले असून त्यांना कुणबी दाखले.मिळत नाही. मराठा समाजाच्या आरक्षण विषयी बोलविलेल्या एक दिवसीय अधिवेशनात विरोधी पक्षांना बोलू न देता सभा तहकूब केली. मराठा भावना तीव्र आहेत त्याठी लढा देणार आहे. भाजप तळागाळातील जनतेचे विचार करत नाही फक्त उद्योगपतींचे हित पाहणारे मोदी सरकार आहे. सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत. म्हणून पंढरपूर तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आली आहे. काँग्रेस हा गोरगरीब जनता, शेतकरी यांचा विचार करणारा पक्ष आहे असे त्यांनी यावेळी पटवून दिले. या संवाद दौऱ्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी, युवक जिल्हा अध्यक्ष सूनंजय पवार, संदीप पाटील, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, संदीप शिंदे, नागेश फाटे, मिलिंद भोसले, नितीन शिंदे, गणेश माने, राहुल पाटील, किशोर जाधव, शंकर सुरवसे, सतिष अप्पा शिंदे, अक्षय शेळके, संग्राम जाधव, अशोक पाटोळे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.