
सोलापूर : सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दुष्काळाच्या सावटाने संकटात असलेल्या पशुधनाला आज दिवाळीच्या पहिल्या वसुबारस दिवशी चिंब पावसाने मोठा दिलासा दिला आहे.
दुष्काळी स्थितीमुळे खरीपाबरोबरच रब्बी पिकेही संकटात आली होती. पण सोलापूर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गुरुवारी दिवसभर धुरकट हवामान होते. त्यानंतर पुन्हा गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाची संततधर होती. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याचे वृत्त आहे. हा पाऊस ज्वारी व तुरीला पोषक ठरला आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र या पावसाचा फटका बसणार आहे. यंदाची दिवाळी पावसात होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. साखर कारखान्यांनी नुकताच गळीत हंगामाला सुरुवात केली आहे. उसाच्या फडात अनेक ऊसतोड कामगार आपले काम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच पावसाने त्यांना भिजवले आहे. त्यामुळे ऊस तोडणीवर चांगलाच परिणाम दिसून येत आहे.
दिवाळीचा बाजार थंडच
जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे दिवाळीच्या बाजारपेठेवर चांगलाच परिणाम दिसून येत आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस असूनही बाजारात म्हणावी तशी खरेदीला गर्दी झालेली दिसून येत नाही. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग ही नगदी पिके हातची गेल्यामुळे शेतकरी कुटुंबीय आर्थिक संकटात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही दिवाळी थंडच असल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत आहे.