अक्कलकोटला रात्री पावणेनऊला गणिताचा पेपर कष्टडीला
प्रकरण गंभीर असल्याने चौकशीची रिपाईचे अविनाश मडीखांबे यांची मागणी

सोलापूर : दहावीचा गणिताचा पेपर दुपारी एकला संपलेला असताना अक्कलकोट पंचायत समितीच्या कष्टडीला रात्री पावणेनऊला पोहोचविला गेला असून यात काहीतरी गडबड झाल्याचा संशय रिपाइंचे (आठवले गट ) अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी दहावीचा गणिताचा पेपर होता. सकाळी 11 ते दुपारी एक असा पेपरचा कालावधी होता. पेपर संपल्यानंतर दोन ते अडीच तासात पेपर कस्टडीमध्ये पोहोचवणे अपेक्षित आहे. अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीत रात्री पावणेनऊ वाजता रिक्षातून दहावीचे पेपर आणण्यात आले आहेत. या पेपरसोबत शिक्षण विभागातील कोणतीही जबाबदार व्यक्ती नव्हती. एका रिक्षातून रात्री आणण्यात आलेल्या पेपरचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेले आहे. तसेच पंचायत समितीच्या आवारातही कॅमेरे आहेत. दहावीच्या गणिताचे पेपर कस्टडीकडे उशिरा का आले याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी मडीखांबे यांनी केली आहे. अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे हे या कस्टडीचे प्रमुख असल्याचे सांगण्यात आले आहे. पण त्यांचा बेजबाबदारपणा या प्रकारातून उघड झाला आहे. गणिताचे पेपर कस्टडीला येण्यामध्ये इतका उशीर का झाला? यामध्ये काही गडबड झाली का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. एकूणच प्रकरण गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांनी या तात्काळ लक्ष घालून सोक्षमोक्ष करावा. अन्यथा पालकांमधून संताप व्यक्त होणार आहे, असा इशारा मडीखांबे यांनी दिला आहे.