
सोलापूर : सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ 24 एप्रिल रोजी सोलापुरात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक रिंगणात आहेत. आमदार शिंदे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॅक्टर चालला. पण या वेळेस काँग्रेसने भाजप व मोदी यांच्या विरोधात रान उठवले आहे. अशात भाजपने तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिल रोजी सभा घेण्याचे नियोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसनेही सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या सभेचे नियोजन केले आहे. राहुल गांधी यांचा 24 एप्रिल रोजी सोलापूर दौरा होईल असे सांगितले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.