
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील काही भागात रविवारी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे गेल्या आठवड्यात जाणवणारी कडाक्याची थंडी गायब झाली आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे लक्षदीप बेटे तामिळनाडू व केरळ किनारपट्टीवर सध्या पाऊस सुरू आहे. आंध्र, कर्नाटकबरोबर हा पाऊस सोलापूर जिल्हा पर्यंत पोहोचला आहे. शनिवारपासून सोलापूर जिल्ह्यात ढगाळे हवामान निर्माण झाले आहे. हे हवामान ज्वारी, गहू, हरभरा पिकासाठी पोषक ठरले आहे. मात्र द्राक्ष पिकाला या हवामानामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यावर कडाक्याची थंडी सुरू झाली होती. सायंकाळी सहानंतर गारवा जाणवत होता. दक्षिण किनारपट्टीवरील बदलत्या हवामानामुळे सोलापुरातील थंडी गायब झाली आहे. रविवारी हत्तुर, वांगी, वडकबाळ, औराद व मंद्रूपच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. पावसाचा शिडकावा असला तरी ज्वारीला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. पावसाने थोडा जोर लावला असता तर ज्वारीला मोठा फायदा झाला असता असे शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. ज्वारीला पावसाची गरज आहे. अति पावसामुळे यंदा गव्हाच्या पेरणीला बराच उशीर झाला आहे. अजूनही पेरण्या सुरूच आहेत. पण या बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्य व जनावरांना फटका बसू लागला आहे.