अरे हे काय? हायवेच्या दुभाजकामध्ये उगवले काटेरी गवत
सोलापूर- हत्तूर या नवीन रस्त्याच्या सुशोभीकरणाची लावली वाट

सोलापूर : हत्तूर ते केगाव बायपासच्या निर्मितीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सोलापूर ते हत्तूर दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती केली आहे. या नवीन रस्त्याच्या दुभाजकाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने काटेरी गवत उगवल्यामुळे महामार्गाच्या सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे.
हत्तूर -केगाव बायपासच्या निर्मितीनंतर हत्तूर ते सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान एकेरी रस्ता होता. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याची रुंदी वाढवून दुपदरी रस्ता तयार केला आहे. या रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले होते त्या ठेकेदाराने रस्त्याची बांधणी करून चांगल्या दुभाजकाची उभारणी करणे गरजेचे होते. परंतु रस्त्याचे काम चांगले झाले पण दुभाजक मात्र छोट्या उंचीचा उभारण्यात आला. त्या दुभाजकांमध्ये हिरवळ निर्माण करण्यासाठी चांगली माती घालून रोपांची लागवड करणे अपेक्षित असताना रस्त्याकडेची माती भरून चुकीच्या पद्धतीने भर उन्हाळ्यात मे महिन्यात झाडे लावण्यात आली. कडक उन्हाळ्याने ही झाडे जळून गेली. त्यानंतर झाडाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी टॅंकरने वेळेत पाणी घालणे आवश्यक असताना त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व झाडे वाळून गेली असून काटेरी गवत उगवले आहे. यामुळे रस्त्याच्या सौंदर्यकरणात बाधा येत असून चकाचक रस्त्यामध्ये उगवलेले गवत पाहून लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हत्तूरनंतर मुख्य महामार्ग लागतो. या महामार्गावर चांगली हिरवळ व फुलझाडे दिसून येतात. अशाच पद्धतीने हत्तूर ते सोरेगाव दरम्यानच्या रस्त्याची देखभाल व्हावी, अशी मागणी होत आहे.