
सोलापूर : सोलापुरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच रविवारी मीरानगरचा अंतर्गत रस्ता पूर्ण करणाऱ्या मनपाच्या रस्ते इंजिनियरच्या कामाचे नागरिकांतून अफाट कौतुक होत आहे. चक्क डीपी रस्त्यापासून दोन फूट उंचीवर नवीन रस्त्याचे काम पूर्ण करणाऱ्या ठेकेदार व कामाच्या पर्यवेक्षणाला नियुक्त असलेल्या इंजिनीयरला पुरस्काराच दिला पाहिजे अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटल्या आहेत.
गेल्या दहा वर्षात जुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणावर वसाहती झाल्या आहेत. अलीकडच्या काळात या वसाहतीत अंतर्गत रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. बिल्डरने वसाहत करताना निर्माण केलेला रस्ता व घरे आता या नवीन रस्त्याने मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत. महापालिकेच्या इंजिनियरने नवीन रस्ते करताना बाजूच्या घरांचा विचार केलेला दिसत नाही. जुळे सोलापुरातील सैफुल ते आयएमएस स्कूलच्या मार्गावर असलेल्या मीरानगरच्या अंतर्गत रस्त्याचे काम रविवारी पूर्ण करण्यात आले. मूळ डीपी रस्त्यापासून हा रस्ता सुमारे दोन फूट उंच झाला आहे. या रस्त्यामुळे कॉलनीतील घरे खाली गेली आहेत. आता पावसाळ्यात येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय या कॉलनीतून बाहेर पडणारा रस्ता डीपी रस्त्याला उतारावर जोडला गेला आहे. त्यामुळे कॉलनीतून वेगाने येणाऱ्या वाहनांना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मूळ डीपी रस्त्याची उंची व कॉलनीतील घरे यातून रस्ता कशा पद्धतीने झाला पाहिजे याचे परीक्षणच महापालिकेकडून झाल्याचे दिसत नाही. ठेकेदाराने वर्कऑर्डरमधील त्याच्या नियमाप्रमाणे रस्ता केला. पण यात मूळ डीपी रस्त्याची उंची व कॉलनीतील लेवल घेण्याबाबत अट घातली होती का? हे तपासणे गरजेचे झाले आहे. जुळे सोलापुरात अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी रस्ते बांधण्यात आले आहेत. अशी कामे होताना महापालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडून खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. आता या रस्त्याने नागरिकांची सोय केली असली तरी भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे असे रस्ते निर्माण करणाऱ्या सोलापूर महापालिकेतील या अभियंतांचा सन्मानच केला पाहिजे, अशा प्रतिक्रिया जुळे सोलापुरातील नागरिकांतून उमटल्या आहेत. विकास कामे करताना लोकप्रतिनिधी व महापालिकेतील अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्याने हे काम कोणत्या निधीतून करण्यात आले याचेसुद्धा प्रसिद्धीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे तक्रार कशी करायची असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींनी सोलापुरात अपघाताविषयी नुकतीच बैठक घेतली. यात त्यांनी अपघाताचे स्पॉट तयार होऊ नये याविषयी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोलापूर शहरातील अपघातावर चिंता व्यक्त करून उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले आहेत. पण सोलापुरात सुरक्षित वाहतूक होण्यासाठी कोलमडलेली मनपाची परिवहन व्यवस्था आणि अशा चुकीच्या पद्धतीतून उभारण्यात येणाऱ्या रस्त्यांविषयी कोणीच लक्ष वेधले नसल्याचे दिसून येत आहे.