
सोलापूर : जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मूर्त मिळेनासा झाला आहे. उद्घाटनासाठी पुन्हा तारीख पे तारीख सुरू झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय सुरू झाला आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गुरुनानक चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयास 10 फेब्रुवारी रोजी भेट दिली होती. या रुग्णालयाचे उद्घाटन कधी होणार? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी आरोग्य मंत्री सावंत यांनी केली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अद्याप बांधकामातील काही त्रुटी आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच आरोग्य विभाग ही इमारत ताब्यात घेईल. बांधकाम विभागामार्फत या इमारतीचे बांधकाम झाले आहे. त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर आरोग्य विभागाकडे इमारतीचे हस्तांतर होईल. त्रुटी असताना आम्ही इमारत ताब्यात घेणार नाही. फेब्रुवारीअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल त्यानंतर उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले होते.
जिल्हा व महिला बाल रुग्णालयाचे उद्घाटन कधी होणार व कामाच्या त्रुटीबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. याकडे लक्ष वेधले असता आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले होते की आमदार प्रणिती शिंदे यांनी सिविल हॉस्पिटलबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सिव्हिल हॉस्पिटल हे वैद्यकीय कॉलेजचे आहे तर आता नव्याने होणारे जिल्हा व महिला बाल रुग्णालय हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहे. त्यांना या दोन्हीमधील रियालिटी माहित नसल्यामुळे केवळ शिवसेनेच्या मंत्राला प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असावा अशी शंका व्यक्त केली होती. आरोग्य मंत्री सावंत यांनी आधी जानेवारीत व नंतर फेब्रुवारी अखेर उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल असे स्पष्टीकरण दिले होते पण या दोन्ही तारखा पुढे गेल्यामुळे उद्घाटनासाठी तारीख पे तारीख सुरू झाल्याने नागरिक संभ्रमात आहेत. आरोग्य विभागाने नवीन रुग्णालयात फर्निचर, मशिनरी बसविण्याचे काम केले आहे. आता आहे ती फक्त उद्घाटनाची प्रतीक्षा.