
सोलापूर : सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळेल, असा दावा शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.
सोलापूर लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोण निवडून येणार? कोणाला, कुठून मताधिक्य मिळणार? याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. लोकांमध्येही वेगवेगळी चर्चा सुरू आहे. आमचाच उमेदवार निवडून येणार म्हणून दावे, पैजा लावल्या जात आहेत. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे हे बुधवारी जिल्हा परिषदेत कामानिमित्त आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काका साठे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. काय परिस्थिती होती? असे पत्रकारानी विचारल्यावर काका साठे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला सर्वाधिक लीड मिळेल, असा दावा केला. या मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील व विद्यमान आमदार यशवंत माने यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. काँग्रेसला बुथला पोलिंग एजंटही मिळणार नाही, असा दावा करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना काका साठे म्हणाले, लोकांनीच विद्यमान आमदारांना प्रचाराला गेल्यावर निक्षून सांगितले आहे. विधानसभेला या, ही लोकसभा आहे, आमच आम्ही ठरवतो. महायुतीच्या एका मंत्र्याची सभा गद्दार, गद्दार म्हणत उधळण्यात आली. आमदारांना मतदारांनी खिशात घातल्याचे चित्र दिसून आले. सत्ताधाऱ्यांविरुद्ध लोकांमध्ये तीव्र असंतोष दिसून आला. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळणार, असा दावा साठे यांनी केला. नरखेड, अनगरला काँग्रेसला चांगले मतदान दिसून येईल असे त्यांनी स्पष्ट केले.