सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारात मोठी चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते “गनिमी काव्याच्या तयारीत असल्याने अपक्ष उमेदवार धर्मराज काडदी यांचे बळ वाढण्याचे चित्र दिसत आहे.
दक्षिण सोलापुरात विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या विरोधात महाविकास आघाडीने माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, धर्मराज काडादी, बाबा मिस्त्री यांनी उमेदवारी मागितली होती. पण उद्धव ठाकरे सेनेने आधीच अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेस इच्छुकांची मोठी गोची केली. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेल्या माजी आमदार दिलीप माने यांनी माघार घेतली तर प्रहार कडून बाबा मिस्त्री व अपक्ष म्हणून धर्मराज काडादी हे निवडणूक रिंगणातच राहिले आहेत. पाटील यांच्या उमेदवारीच्या वेळेस महाविकास आघाडीत जे राजकारण घडले त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पाटील यांनाही नाराजी दूर करणे अवघड झाले आहे. अशात काडादी यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना कोणाबरोबर जावे हा प्रश्न पडला आहे. निवडणूक रिंगणात उमेदवार वाढल्यामुळे महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांची निवडणूक सोपी झाल्याचे बोलले जात होते. पण आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेगळाच पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. “गनिमी काव्या’द्वारे काडादी यांना साथ देण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे. काडादी यांच्या पाठीमागे राहण्याबाबत काहीजणांनी बैठक घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. अशात दक्षिण सोलापूर काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष उमाशंकर रावत यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. काडादी वगळता सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे आगामी काळात काडादी यांची रणनीती काय असेल? याकडे इतर उमेदवारांचे लक्ष वेधले आहे.