
सोलापूर : विवाह नोंदणीचा दाखला देण्यासाठी ज्यूस विक्रेत्यामार्फत एक हजार रुपयाची लाच घेताना तिऱ्हेच्या ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी उत्तर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर रंगेहात पकडले आहे.
विठ्ठल पांडुरंग शिंदे (रा. प्रतापनगर, सोलापूर) असे लाचप्रकरणी कारवाई केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. शिंदे यांची नेमणूक तीरे ग्रामपंचायतीत असून बेलाटीचाही अतिरिक्त पदभार आहे. बेलाटी येथील विवाहित तक्रारदाराला विवाह नोंदणीचा दाखला हवा होता. त्यानी ग्रामपंचायतीत अर्ज करून ग्रामसेवक शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यावर या कामासाठी एक हजार लाचेची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा लावला. गुरुवारी दुपारच्या सुमारास ग्रामसेवक शिंदे हे उत्तर पंचायत समितीच्या कार्यालयात आले होते. त्यानी तक्रारदाराला या कार्यालयात येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने त्यांची भेट घेतल्यावर ग्रामसेवक शिंदे यांनी कार्यालयासमोरील ज्यूस विक्रेते खलील शब्बीर नदाफ (रा. समाधान नगर अक्कलकोट रोड) यांच्याकडे एक हजार रुपये देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने नदाफ यांच्याकडे हजार रुपये दिले व नदाफ यांनी पैसे मिळाल्याचा इशारा केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दोघांभोवती गराडा घातला. या दोघांना ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महाडिक करीत आहेत.