
सोलापूर : सोलापूरकरांनो लोकसभेला मतदान करण्यास जाताना काँग्रेस काळात हिंदूला आतंकवादी म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री कोण होते? हे जरा आठवा, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव न घेता केली.
सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा बुधवारी दुपारी शांती चौकातील वल्याळ मैदान येथे झाली. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, उमेदवार आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, देवेंद्र कोठे, मनीष काळजे, राष्ट्रवादीचे किसन जाधव, भाजप सेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी साडेतीन वाजता त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. 3.35 वा. त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ते भाषणाला व्यासपीठावर उभे राहिल्याबरोबर उपस्थित यांनी ‘बुलडोजर बाबा की जय” अशा घोषणा दिल्या. बरोबर चार वाजता त्यांचे भाषण संपले. ‘भारत माता की जय, फिर एक बार मोदी सरकार” अशी घोषणा करून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मुख्यमंत्री योगी म्हणाले मी देशभर दौरा करीत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मोदी यांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. ‘जो राम को लाये है, उनको हम लायेंगे” असा उत्साह लोकांमध्ये दिसत आहे. पाचशे वर्षानंतर पंतप्रधान मोदी यांनी आयोध्येत प्रभू श्री राम मंदिराची उभारणी केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसलाही ही संधी होती. पण काँग्रेसने प्रभू श्रीराम यांचे अस्तित्वच मान्य केले नव्हते. राम मंदिर उभारले तर देशात मोठा गजब होईल असा दावा काँग्रेस नेते करीत होते. पण पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिरची उभारणी केलीच. देशात कुठेही काय झाले नाही, उलट आता लोकांमध्ये उत्साह वाढला आहे. काँग्रेस नेत्यांनी आजपर्यंत मतावर डोळा ठेवून हिंदूंच्याबाबतीत राजकारणच केले. हिंदूंना आतंकवादी म्हणण्याचे धाडस काँग्रेसवाल्यांनी केले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री कोण होते? हे ही आठवा याची आठवण योगी आदित्यनाथ यांनी यावेळी करून दिली.
उत्तर प्रदेशात राम मंदिराची उभारणी झाली. गुंडगिरीचेही रामनाम सत्य झाले आहे. मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात कुठेही आतंकवाद दिसून आलेला नाही. देशात कुठे फटाका फुटला तरी पाकिस्तानला भीती वाटते. आमचा काही हात नाही अशी लगेच ते घोषणा करतात. अशी जगभरात मोदी सरकारने जरब बसविली आहे. देशाच्या विकासाबरोबर सुरक्षिततेलाही मोदी सरकारने महत्त्व दिले आहे. गरीब लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना त्यांनी राबविल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनुसार सरकार चालवत, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिप्रेत असलेली सामाजिक न्याय ही भूमिका, सावित्रीबाई फुले यांच्या महिला सक्षमीकरण व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व मोदी यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. पण काँग्रेसवाल्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विनाकारण अपप्रचार सुरू केला आहे. काँग्रेसचा हा डाव कदापि यशस्वी होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला