
![]()
सोलापूर : भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांने शाई फेकलेला शर्ट बदलून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली तर नवीन पालकमंत्र्यांच्या भेटीला दक्षिणचे ‘बापू” सोलापुरी चादर घेऊन आले होते तर उत्तरचे ‘मालक” मात्र गर्दीत दिसले नाहीत.
सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील हे रविवारी सायंकाळी सोलापूर दौऱ्यावर आले. शासकीय विश्रामधामवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तरीही खाजगीकरणाच्या विरोधात घोषणा देत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. या प्रकरणानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत वातावरण निर्मिती केली. त्यानंतर शाईने माखलेला शर्ट बदलून पालकमंत्री पाटील यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरी चादर आणली होती तर आमदार विजयकुमार देशमुख मात्र गर्दीत कोठे दिसले नाहीत. पालकमंत्री पद सोलापूरच्या स्थानिकांना मिळावे अशी बऱ्याच दिवसापासून मागणी होत आहे. त्यात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना हे पद मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पाटील यांच्या स्वागताला बापू समर्थकांचीच जास्त गर्दी दिसत होती. तत्कालीन पालकमंत्री विखे- पाटील यांच्यावर भंडारा उधळण्यात आल्यानंतर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले. पण अतिशय कडक असा बंदोबस्त असतानाही हा बंदोबस्त तोडून भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून खाजगीकरणाला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. पाटील यांच्या पहिल्याच दौऱ्याला या प्रकाराने गालबोट लागले. त्यानंतर पाटील यांनी विश्रामगृहातील आपल्या कक्षात जाऊन त्वरित शर्ट बदलला आणि नागरिकांची निवेदन घेत कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. शाईफेक प्रकार व्हायरल झाल्यानंतर पाटील यांना फोन येऊ लागले. सर्वांना त्यांनी एकच उत्तर दिलं “अरे मी लगेच शर्ट बदलला आणि पाचशे लोकांची भेट घेतली, काही काळजी करू नका”. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या नित्यक्रमाला सुरुवात केली आहे. शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाल्याने आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ते तुळजापूरला रवाना झाले आहेत.
देवीमुळे लगेच गेले…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला आम्ही पुणे नाक्याला गेलो होतो. आमदार विजयकुमार हे ही आले होते. शासकीय विश्रामगृहवर भेट घेऊन ते लगेच देवीच्या मिरवणुकांसाठी रवाना झाले, अशी माहिती माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली