अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरून निर्माण होते झेडपीची प्रतिमा
कक्ष नूतनीकरणाबाबत विनाकारण केली जातेय बदनामी

सोलापूर :अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरून जिल्हा परिषदेची प्रतिमा तयार होत असते असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले. कक्ष नूतनीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत सीईओ आव्हाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी कक्षाच्या नूतनीकरणाबाबत झालेल्या खर्चाबाबत माहिती विचारली. त्यावर उत्तर देताना सीईओ आव्हाळे म्हणाल्या जुन्या कार्यालयाचे खूप वर्षांपूर्वी नूतनीकरण झाले होते. जुन्या कार्यालयात खेळती हवा नसल्याने कोंदट वातावरण होते. त्यामुळे कार्यालय शिफ्ट केले. नवीन कार्यालय करताना जादा खर्च होणार नाही याची दक्षता घेतली. निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून दहा लाखाची तरतूद आहे. कौलारू जुनी इमारत असल्याने काही दुरुस्ती करावीच लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम आहे. त्यामुळे याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत असून उलट जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या दालनावरून प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांचे दालन चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न राहील.
ही जिल्हा परिषद सर्वांची आहे. मी दोन वर्ष काम करेन. पण येथील नागरिकांनाच जिल्हा परिषदेची प्रतिमा सांभाळावी लागणार आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टीला मी पाठीशी घालणार नाही. जिल्हा परिषदेचे राज्यभर नाव होईल, याकडे माझा प्रयत्न राहणार आहे. वाररूममधून जल जीवन बरोबर इतर विभागाचीही कामे सुटसुटीत होतील, याकडे लक्ष देणार आहे. तीन महिन्यात जल जीवनची कामे बऱ्यापैकी मार्गावर लागल्याचे समाधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यात टंचाई असल्याने वाड्यावर त्यांच्या पाणी प्रश्नावर भर देणार आहे असेही त्या म्हणाल्या.