अर्ज आला की शासकीय माहिती तात्काळ द्या
माहिती अधिकार याबाबत जिल्हा विकास यंत्रणा कार्यालयात झाली कार्यशाळा

सोलापूर : माहिती अधिकार कायदा अधिनियम 2005 अन्वये नागरिकांना आवश्यक असणारी माहिती देणे बंधनकारक असून त्याचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर येथे माहिती अधिकार संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रमध्ये प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे बोलत होते. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी रतिलाल साळुंखे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, कार्यालयीन अधिक्षक सीमा लोखंडे, विस्तार अधिकारी प्रणोती सराफ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी चर्चासत्रात पुढे बोलताना प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी माहिती अधिकार याविषयी मार्गदर्शन करताना माहिती अधिकार म्हणजे कोणत्याही शासकीय निमशासकीय अनुदानित कार्यालयाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती तसेच आवश्यक अशी माहिती जाणून घेणे, त्याची कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे माहिती अधिकारासाठी एखाद्या नागरिकाने मागणी केली असता ती अगदी विहित वेळेत कुठल्याही प्रकारची तसदी न बाळगता अचूक माहिती पुरवणे संबंधित अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. तसेच त्यांनी माहिती अधिकाराचे नियम, त्याबद्दलचे फायदे- तोटे याबाबत मार्गदर्शन केले.तसेच प्रत्येक कर्मचारी, अधिकारी यांना माहिती अधिकार याविषयी सजग राहून मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.