
सोलापूर : अपघात विमा क्लेम करण्यासाठी पंचनामा व वाहनाच्या विम्याचे कागदपत्रे देण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना वैराग पोलीस ठाण्यातील हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे (वय 52 वर्ष, नेमणूक वैराग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण (वर्ग 3) आणि झिरो मनोज किशोर वाघमारे (वय 40 वर्ष, रा. सिद्धार्थनगर, वैराग, बार्शी) या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे.
यातील तक्रारदार यांचे वडील रोड अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे दिनांक 11 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्याचा तपास हवालदार सोनकांबळे यांच्याकडे आहे. सदर अपघाताच्या घटनास्थळ पंचनामाचे कागदपत्र हे यातील तक्रारदार यांना इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असल्याने, तक्रारदार यांनी याबाबत पोलीस हवालदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, पो.हवा. सोनकांबळे यांनी घटनास्थळ पंचनामा कागदपत्र देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रुपये स्वीकारण्यास संमती देऊन लाच रक्कम आरोपी खाजगी इसम वाघमारे यांच्यामार्फतीने स्वीकारली. लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेले असून त्यांच्यावर वैराग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार,पोलीस अंमलदार श्रीराम घुगे, पोहवा प्रमोद पकाले, पोशि राजू पवार, चा.पोहवा राहुल गायकवाड यांनी भाग घेतला.