बापरे..! सोलापुरात धुंवाधार पाऊस
संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

सोलापूर : सोलापुरात सोमवारी सकाळी धुवाधार पाऊस सुरू झाला आहे. संततधार पावसामुळे सोलापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सोलापुरात गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. उन्हाचा कडाका वाढल्याने हवेतील आद्रतेमुळे उष्मा जाणवत होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र मूग व उडीदाची काढणी सुरू होती. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चिखल असतानाही मिळेल त्या मजुरांवर किंवा हार्वेस्टरद्वारे उडदाची काढणी उरकण्यात येत होती. अशात पुन्हा शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने सोलापूरसाठी येल्लो झोन अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पावसाची संततदार होती. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व शेतीकामे खोळंबली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसाची रिपरीप सुरूच होती. चाकरमान्यांना सुट्टी असल्याने परिणाम जाणवला नाही. रात्रभर पाऊस सुरू होता. सोमवारही पावसानेच उजाडला. सकाळी सात ते नऊ दरम्यान जोरदार पाऊस झाला. या काळात विद्यार्थ्यांना शाळेत जावयाचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. दूध, वर्तमानपत्र पोचविणाऱ्यांचीही धांदल उडाली. पावसामुळे रस्त्यावरची वाहतूकही मंदावल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात तर पावसामुळे सर्वत्र दलदल दिसून येत आहे. संततधार पावसामुळे भाजीपाला काढणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत आहे. सलग दुसऱ्या दिवशीची कामे खोळंबली आहेत. शेतीसाठी पुरेसा पाऊस झाला आहे. पावसाची अशीच संततदार सुरू राहिल्यास खरीप पिकांचे नुकसान होणार आहे तर रब्बीची पेरणी लांबणीवर जाणार आहे. पावसाने उघडीप दिल्यास ज्वारीच्या पेरणीला आता वेग येणार आहे. सततच्या पावसाने शेतामध्ये तण माजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीसाठी मोठा खर्च येत आहे. अशाच शेतकऱ्यांना गतवर्षीची नुकसान भरपाई मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकटाची शक्यता आहे.