तुमच्या गावच्या विकास आराखड्यात आहे काय?
प्रत्येक तालुक्यात मॉडेल काम करण्याचा झेडपी प्रशासनाचा प्रस्ताव

सोलापूर : पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात ‘आमचा गाव आमचा विकास” चा आराखडा तयार करताना गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या निधी उपलब्धतेसाठी सर्व योजनांचा कृती संगम करुन जिल्ह्याचे विभाग प्रमुख व सर्व गट विकास अधिकारी यांनी समन्वय साधणे अतिशय महत्त्वाचे आहे.शिवाय प्रत्येक तालुक्यात दोन ग्रामपंचायत व जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी, आरोग्य वर्धिनी केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाने प्रत्येकी एक याप्रमाणे एक चांगले माॕडेल करण्यासाठी दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केली.
जिल्हा परिषदेमध्ये १५ वा वित्त आयोग अंतर्गत सन २०२४-२५ चा जिल्ह्यात ‘आमचा गाव आमचा विकास” चा आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व नियोजन बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) इशाधीन शेळकंदे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले,पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, लपाचे कार्यकारी अभियंता पारसे, दक्षिण सोलापूरचे गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, मोहोळचे आनंद मिरगणे, अक्कलकोटचे सचिन खुडे, बार्शीचे माणिकराव बिचुकले, माळशिरसचे विनायक गुळवे, ग्रामपंचायतचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी झेड.ए.शेख उपस्थित होते.’आमचा गाव आमचा विकास”चा आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पूर्व नियोजन बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी आराखडा तयार करताना गावात पूर्वी केलेली कामे, खर्च झालेला निधी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.शिवाय यावर्षीच्या आराखडा तयार करताना इतर योजनांचा निधी तसेच सीएसआर फंड उपलब्धतेसाठी सर्व विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी यांच्यामध्ये समन्वय असायला हवे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
असे करा मॉडेल गाव
आगामी वर्षात खालील तालुक्यात एक माॕडेल काम करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
दक्षिण सोलापूर – अंगणवाडी,
मोहोळ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
माळशिरस – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) – २ अंतर्गत कामे,
बार्शी – पशुसंवर्धन दवाखाना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) – १ ग्रामपंचायत तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २ ग्रामपंचायत माॕडेल करणे. गावाच्या ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाचे मॉडेल करताना ग्रामस्थांसाठी सोय होईल असे काम सुचवणे आवश्यक आहे. यापूर्वी काही गावांनी सर्वांसाठी पिठाची चक्की, पाणी शुद्धीकरण यंत्र, सौर ऊर्जा अशी कामे सुचवली होती. पण ही कामे कागदावरच राहिली आहेत. त्यामुळे प्रत्येक गावाचा विकास आराखडा करताना गरजेच्या मॉडेल कामाचा समावेश असावा, अशी सूचना नागरिकांतून आली आहे.