ना जल ना जीवन, मंद्रूपकरांची पाण्यासाठी भटकंती

सोलापूर : विधानसभेच्या निवडणुका संपल्या पण लोकांच्या समस्यांचा ससेमीरा संपत नाही. आता हिवाळ्याची चाहूल लागली असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपकराना पिण्याच्या पाण्याचे चटके जाणवत आहेत. “पाण्याची टाकी उशाला आणि कोरड घशाला’असे अवस्था ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाअभावी होत आहे.
मंद्रूप येथील नाईक नगर तांड्यावर नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी बाजूलाच ओढ्यात विहीर घेण्यात आली आहे. विहिरीला मुबलक पाणी असतानाही ग्रामपंचायत प्रशासनातर्फे पाणी उपसा करून टाक्या भरणे व नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करणे जीवावर आल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या बहुचर्चित जलजीवन योजनेतून हर घर नळ ही योजना प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील अनेक गावात या योजनेतून कामे वेगाने सुरू आहेत. पण झालेल्या कामांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. ना लोकांच्या घरात नळ आहे ना टाकीत पाणी आहे. लोकांना शेवटी हापशावरून पाणी उपसून आणावे लागत आहे. यासाठी कामकरी महिला व शाळकरी मुलांना पहाटे उठून हापशावर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन योजनेचा गावभर डांगोरा पिटवून असे अवस्था करण्यात आली आहे. हिवाळ्यात ही स्थिती उन्हाळ्यात काय होणार? अशी चिंता नागरिकांना आहे. त्यामुळे जलजीवन योजना जनचिंतन होणार का? अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मंद्रूप गावासाठी ही जलजीवन योजनेतून नवीन पाण्याची टाकी झाली आहे. पण या योजनेतूनही वेळेवर पाणी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीची कर वसुली नसल्याने आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे ग्रामविकास अधिकारी पुजारी यांनी सांगितले.