उन्हाळ्यात लावली फुलझाडे; पावसाळ्यात उगवली काटेरी झुडपे
सोलापूर - हत्तुर मार्गावरील नव्या महामार्गाची स्थिती

सोलापूर : सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र ते हत्तुर बायपासपर्यंत करण्यात आलेल्या नव्या महामार्गाच्या दुभाजकामध्ये चक्क काटेरी झुडपे उगवली आहेत याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने हत्तुर ते केगाव बायपास तयार केल्यानंतर सातरस्ता ते सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र या महामार्गावरील जड वाहतुकीचा प्रश्न संपुष्टात आला. दरम्यान विजयपूर महामार्गावरून सोलापूर शहराकडे येणारी हलकी वाहने यांची नेहमी या मार्गावर गर्दी असते. सातरस्ता ते सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा रस्ता यापूर्वी दोन पदरी करण्यात आला होता. तिथून पुढे रस्ता एक पदरीच होता. हातुर बायपास झाल्यानंतर सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र ते बायपासपर्यंत हा रस्ता दुहेरी करण्यात आला. गतवर्षी मार्चमध्ये याचे काम पूर्ण झाले. ठेकेदाराने काम पूर्ण करताना रस्त्याच्या दुभाजकामध्ये ऐन मे महिन्याच्या उन्हाच्या काळात फुलझाडे लावली. उन्हाच्या कडाक्याने ही फुलझाडे वाळून गेली. आता दुभाजकात चक्क काटेरी झुडपे उगवली आहेत. याचबरोबर रस्त्याच्या बाजूला करण्यात आलेल्या साईड पट्टीचीही जागा या काटेरी झुडपानी घेतली आहे. त्यामुळे नवीन केलेल्या महामार्गाचे सौंदर्य बिघडले आहे. उन्हाळ्यात फुलझाडांची लागवड करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला आता पावसाळ्यातील काटेरी झुडपे दिसत नाहीत का? असा सवाल येतील येणारे जाणारे वाहन चालक उपस्थित करीत आहेत.