सोलापूर झेडपीत भाजपचे आमदार आले अन अधिकाऱ्याची झाली तडकाफडकी बदली
ग्रामपंचायत विभागाचे प्रशासनाधिकारी प्रशासन अधिकारी झेड. ए. शेख यांची तडकाफडकी बदली

सोलापूर : जिल्हा परिषदेत मंगळवारी भाजपचे आमदार आले आणि ग्रामपंचायत विभागातील प्रशासन अधिकाऱ्याची बदली झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मंगळवारी जिल्हा परिषदेत आले होते. त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयात ते बराच वेळ ठाण मांडून होते. या दरम्यानच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांना बोलाविण्यात आले. जलजीवनच्या कामाविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ग्रामपंचायत विभागाचे प्रशासन अधिकारी झेड. ए. शेख यांची बांधकाम विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली तर बांधकाम विभागातील सिद्धाराम बोराटे यांना ग्रामपंचायत विभागाचा पदभार देण्यात आला. ग्रामपंचायत विभागातील तक्रारीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण भाजप आमदारच्या एन्ट्रीनंतर झेडपीत घडलेल्या या चमत्कारामुळे बुधवारी चर्चेचा विषय झाला आहे.
ठेकेदार खासदारांच्या भेटीला
जलजीवांची कामे घेतलेल्या ठेकेदारांना कामाला उशीर झाल्यामुळे दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वैतागलेले ठेकेदार काँग्रेसचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या भेटीला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जलजीवनच्या टेंडरमध्ये घोळ झाल्यामुळे उशिरा वर्कऑर्डर देण्यात आल्या आणि आता बिले मंजूर करताना कामास विलंब झाला म्हणून दंड लावण्यात येत असल्याची त्यांची कैफियत आहे.