
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कामाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. चक्क दोन वर्षांपूर्वी आजोबा गणपतीसमोर झालेल्या लाईटच्या कामाचे टेंडर महापालिकेने नव्याने काढल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सोलापूर महापालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत यापूर्वीच संपली आहे. महापालिकेवर आयुक्तांचे प्रशासकराज सुरू आहे. प्रशासक राजवट सुरू झाल्यापासून महापालिकेच्या कामाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशातच आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. माणिक चौकातील आजोबा गणपतीसमोर डेकोरेटिव्ह लाईट पोल उभारण्याचे टेंडर महापालिकेने जारी केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे काम दोन वर्षांपूर्वी झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. विजापूर वेस ते मधला मारुती चौक दरम्यान डेकोरिटी लाईटचे पोल उभारण्यात आले आहेत. या कामाचे टेंडर आता नव्याने काढण्यात आल्याची स्थानिकांची तक्रार आहे. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाचे अभियंता परदेशी यांना विचारले असता हे काम आमच्या विभागाचे नसून सात नंबर झोन कार्यालयाने टेंडर जारी केले असावे असे सांगितले आहे. महापालिकेने ऑनलाइन जारी केलेल्या टेंडरनुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिले असता, डेकोरेटिव्ह पोल उभे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिका आता नव्याने आणखी डाव्या बाजूने असे पोल उभे करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या टेंडरबाबत नागरिकांनी व्यक्त केलेला संशय खरा असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.
देशमुखांची अडचण होणार ?
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात अशी कामे होत आहेत. रस्ते व लाईटच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आमदार देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असे दिसत आहे.