कलेक्टर कुमार आशीर्वाद यांचे ‘या” गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष
ऑफिसर्स क्लबच्या कारभारात लक्ष घालण्याची मागणी

सोलापूर : ऑफिसर्स क्लबचे अध्यक्ष आणि सचिव बदललेले आहेत. पदसिद्ध अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी अद्याप ऑफिसर्स क्लबच्या कारभारात लक्ष घातले नसल्याची तक्रार आहे.
सोलापूर ऑफिसर्स क्लबच्या खर्चात अनियमितता झाल्याची तक्रार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे अध्यक्ष पदावर असताना सदस्यांना डेव्हलपमेंट चार्ज लावण्यात आला. याला सदस्यांनी विरोध केला. क्लबची मोठी रक्कम बँकेत अनामत ठेव असताना डेवलपमेंट चार्ज कशासाठी? असे विचारले गेल्यावर कोरोना महामारीच्या काळात त्या वेळच्या पदाधिकाऱ्यांनी ठेव मोडून ऑफिसर्स क्लबच्या कामावर खर्च केल्याचे दिसून आले. याबाबत क्लबचे सदस्य तथा माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी तत्कालीन महसूल मंत्राकडे तक्रार केली. ही तक्रार चौकशीसाठी परत जिल्हाधिकाऱ्यांकडे आली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यावर लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांनी हा प्रश्न लावून धरला. त्यावर धर्मादाय उपायुक्त यांनी ही तक्रार सदर बझार पोलीस ठाण्याला संबंधिताची तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी अद्याप दिंडोरे यांचा जबाब नोंदवलेला नाही. तपास कोणाकडे द्यायचा यावरूनच अद्याप फाईली फिरवल्या जात आहेत. पोलिसांनी आपल्याला तक्रार देण्यासाठी शास्त्रीनगर पोलीस चौकीत बोलावले होते असे दिंडोरे यांनी सांगितले. पण तपास कोणाकडे आहे याबाबत खात्री न झाल्याने पुन्हा बोलावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
इकडे ऑफिसर्स क्लबचे अध्यक्ष व सचिव बदलले आहेत. शंभरकर यांची बदली झाल्यानंतर कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला. त्यामुळे ऑफिसर्स क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष ते आहेत. त्याचबरोबर क्लबच्या सचिव तथा तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कांबळे आलेले आहेत. त्यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी आहे. या दोघांनीही अद्याप ऑफिसर्स क्लबच्या कामात लक्ष घातले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या काळात अनियमितता झाली तेच कर्मचारी अजून पदावर असून तत्कालीन सचिवांनी काय चौकशी केली व ऑडिटचे काम कुठवर आले याची माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना ऑफिसर्स क्लबच्या कामात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी सदस्यांनी मागणी केली आहे.