
सोलापूर : एकेकाळी वादग्रस्त ठरलेल्या जलजीवन योजनेच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.
जिल्ह्यातील गावाच्या पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी व प्रत्येक घरात नळाचे कनेक्शन जोडण्यासाठी केंद्र शासनाने सुमारे 850 कोटीचा निधी मंजूर केला आहे. केंद्र शासनाच्या ‘हरघर नल” योजनेअंतर्गत जलजीवन या योजनेतून मोठी कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सुरू करताना काढण्यात आलेल्या टेंडरच्या मंजुरीतून मोठा वाद निर्माण झाला होता. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत हे प्रकरण गाजले. तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने टेंडर प्रक्रियेतील अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. त्या अनुषंगाने खातेनिहाय चौकशी व कारवाया सुरू झाल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर जलजीवनच्या कामाला प्राधान्य दिले. सततच्या पाठपुराव्यामुळे आता बरीच कामे मार्गी लागली असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नव्याने 142 गावाच्या योजनेचे टेंडर निघाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संबंधित गावाची कामे थांबविण्यात आली आहेत तर स्थानिक आमदारांच्या पाठपुराव्यामुळे आणखी 112 वाड्यावस्त्यासाठी ही योजना मंजूर झाली आहे. जलजीवन ची कामे वेगाने होण्यासाठी व त्यात काही अडचणी राहू नयेत यासाठी जिल्हा परिषदेत पुन्हा वाॅररूम सुरू करण्यात आली आहे. त्यातून एकाच ठिकाणी सर्व कामांचा पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. राज्यात ‘टॉप फाईव्ह” मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे नाव होईल, अशा पद्धतीने या कामाला गती देण्यात येत असल्याचे आव्हाळे यांनी सांगितले