आता मोदी तांदूळ ही काय भानगड?
विक्रेते नागरिकांना आधार कार्ड मागत असल्याने संभ्रम

सोलापूर : सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून 29 रुपये किलो दराने तांदळाची विक्री सुरू झाली आहे. विक्रेते आधार कार्ड मागत असल्याने ही कुठली योजना? असा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शासनातर्फे रेशन दुकानात मोफत तांदूळ दिला जातो. बऱ्याच कुटुंबात अधिक सदस्य असलेल्यांना महिनाकाठी तांदूळ शिल्लक राहत असे .असा तांदूळ विकला जात असल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले होते. असे तांदूळ दहा रुपये किलो दराने संकलित करून काहीजण रिक्षांमधून दुपटीने पुन्हा इडली करण्यासाठी विकत असल्याचे दिसून आल्यावर याबाबत तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर हा प्रकार बंद झाला. आता पुन्हा रिक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या बॅगमधून 29 रुपये किलो दराने तांदूळ विकला जात आहे. नाफेडचा हा तांदूळ असल्याचे सांगण्यात येत असून यासाठी नागरिकांना आधार कार्ड मागितला जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत कामगार नेते विष्णू कारमपुरी यांनी जिल्हा पुरवठा व रेशन दुकानदाराकडे चौकशी केली आहे. रेशन दुकानदार संघटनेचे नितीन पेंटर यांनी आपल्याकडे अशी कोणतीही सूचना आली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही योजना नेमकी कोणती व कोणासाठी सुरू झाली याबाबत जिल्हा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी होत आहे.