
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे वीज पडून मरण पावलेल्या लावण्या माशाळे हिच्या अंत्यविधीवेळी महिलांचा आक्रोश पाहून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनाही हुंदका आवरता आला नाही.
काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे या शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर होत्या. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, मोहोळ तालुक्यातील कामती, उतर सोलापूर तालुक्यातील गावांचा दौरा करून रात्री उशिरा त्या सोलापुरात पोहोचल्या. यादरम्यानच त्यांना मुस्ती येथे अवकाळी पावसाच्या वेळी घडलेली घटना कळाली. 8 वर्षाची चिमकुली लावण्या माशाळे ही खेळत असताना वीज पडून मरण पावल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी रविवारी सकाळी साडेसहा वाजता त्या जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व मनोज यलगुलवार यांच्यासह मुस्ती येथे पोहोचल्या. यावेळी लावण्याच्या अंत्यविधीची तयारी करण्यात येत होती. महिलांचा आक्रोश सुरू होता. हे दृश्य पाहून आमदार प्रणिती शिंदे याही गलबलून गेल्या. अंत्यविधी होईपर्यंत त्या तिथेच थांबल्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वांना धीर दिला.
कु. लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफसीआय येथे तिच्या मात्यापित्यासह वास्तव्यास होती. तिच्या मावशीचे रविवारी 21 एप्रिल रोजी लग्न असल्याने, आजोळी आली होती. ती त्यांच्या घराच्या गच्चीवर ४-६ लेकरांसह खेळत होती. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे तिच्या मावशीच्या लग्नावरही शोककळा पसरली. या नैसर्गिक आपत्तीनंतर शासकीय यंत्रणा तेथे पोहोचली नसल्याचे समजताच आमदार शिंदे यांनी माशाळे हिच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.