सोलापूरजिल्हा परिषद

पालकमंत्र्यांच्या ‘चॉकलेट”चे सोलापूरच्या डीएचओना अजूनही टेन्शन

सोलापूर : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले हे अजूनही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या ‘चॉकलेट”च्या टेन्शनमध्ये असल्याचे चित्र दिसून येत आहेत. कार्यालयातील त्यांची उपस्थिती जाणून घेतली असता अजूनही त्यांचे आरोग्य विभागाच्या कामकाजावर लक्ष नसल्याचे दिसून आले.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांना जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे झालेले नवीन बांधकाम व त्यात कामकाज सुरू करण्यात होत असलेल्या दिरंगाईकडे आमदारांनी लक्ष वेधले होते. आरोग्य केंद्रातील औषध व्यवस्था व उपस्थित कर्मचारी यावरून सर्वांनी डॉ. नवले यांना लक्ष केले होते. त्यांच्या उत्तरावर आमदारांचे समाधान झाले नव्हते. माजी आरोग्यमंत्री, आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांना बदला अशी मागणी केली होती. त्यामुळे डॉ. नवले यांच्याविरुद्ध वातावरण तापले होते. या सभेनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पंढरपूरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आरोग्य केंद्राला भेट दिल्यावर डॉ. नवले यांच्या आरोग्य कार्ड वाटपाच्या कामाचे समाधान व्यक्त करून त्यांना ‘चॉकलेट” दिले होते. यावेळी आमदार समाधाना अवताडे उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या या कृतीनंतर भाजपच्या इतर आमदारांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपमध्ये अशाप्रकारे ‘चॉकलेट” देणे म्हणजे ‘करेक्ट कार्यक्रम” करणे असे मानले जाते. त्यामुळे आपले पुढे काय होणार? या टेन्शनमध्ये डॉ. नवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कार्यालयातील त्यांची उपस्थिती व कामकाजातील विस्कळीतपणा कायम दिसून येत आहे. जिजाऊ  जयंतीच्या कार्यक्रमालाही डॉ. नवले हजर नव्हते. पुण्याच्या बैठकीनंतर त्यांनी पंढरपूर तालुक्यातील आरोग्य केंद्राला भेट दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्या दिवशी ते कार्यालयात आले नव्हते. त्यानंतर शिवसेनेच्या आरोग्य शिबिराच्या तयारीत ते गुंतले होते. या आरोपानंतर आरोग्य केंद्राच्या कामकाजाला गती मिळणे अपेक्षित असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे नवले यांच्या कार्यपद्धतीवर भाजपचे आमदार अद्यापही नाखूष असल्याचे सांगितले जात आहे.  त्यामुळे पालकमंत्र्याच्या ‘चॉकलेट” नंतरही डॉ. नवले यांचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button