वैज्ञानिक प्रकल्प बांधणी स्पर्धेत अंबिकानगर झेडपी शाळा प्रथम

सोलापूर : आर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर येथे घेण्यात आलेल्या शालेय विध्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रकल्प बांधणी व सादरीकरण स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर तालुका उत्तर सोलापूर या शाळेच्या विध्यार्थ्यानी घवघवीत यश मिळविले आहे.सोसायटी ऑफ आटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया, महिंद्रा राईज व आविम सोलापूर ओलंम्पिक्स सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्कीमर व जेट टॉय असे हवेवर चालणाऱ्या वैज्ञानिक खेळणी व उपकरणांचे सादरीकरण विध्यार्थ्यानी केले आहे. उपकरणाचे वेग, वळण व वजन नेण्याची क्षमता यावरील वैज्ञानिक तत्व वापरून निर्मिती विध्यार्थ्यानी स्वतः केली व त्याचे सादरीकरण उत्कृष्ट पद्धतीने केले.
या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील नामवंत शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी होणारी जिल्हा परिषद शाळा अंबिकानगर ही एकमेव जिल्हापरिषद शाळा होती. पहिल्यांदाच सहभागी होऊन शाळेने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावले आहे. त्यामुळे सिम्बायसिस इन्स्टिट्यूट पुणे येथे होणाऱ्या राज्य स्तर स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली आहे.याबद्दल शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. या स्पर्धेत जेट टॉय स्पर्धेत वैष्णवी कवडे,गणेश एडके, आर्यन कवडे, श्रुती राऊत व आरव बोराडे हे सहभागी होते. त्याचप्रमाणे स्कीमर स्पर्धेत अक्षता राठोड, स्वरा राऊत शहाना शेख,श्रद्धा कारंडे व साहिल सय्यद हे विध्यार्थी सहभागी झाले होते.
या विध्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक शिवशंकर राठोड, शिवाजी वडते, रंजना काटकर, वैशाली गोंदकर, रसिका बंदिछोडे व मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे व आर्किड कॉलेज येथील विद्यार्थिनी स्नेहल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मी कनकधर, आविम सोलापूर टीमचे प्रा. बी. आर. बिराजदार,प्रा. डी.डी. भोगे व प्रा. एस. एस. काळे यांनी अभिनंदन केले आहे.