सोलापूरच्या पत्रकारितेचा मुंबईत झाला सन्मान
लघुउद्योगासाठी सोलापुरात आहे मोठी संधी

सोलापूर : सोलापुरात लघुउद्योजकांना मोठी संधी आहे, असे मत महाराष्ट्र उद्योग विभागाचे उपायुक्त प्रकाश वायचळ यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे यांचा त्यांनी मुंबईत बोलावून सन्मान केला. सोलापूरच्या विकासात्मक पत्रकारितेबाबत अभिमान व्यक्त करीत सर्वसमावेशक पत्रकारितेचा हा गौरव असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
उद्योग उप आयुक्त प्रकाश वायचळ यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. येथून बदली झाल्यावर त्यांना पदोन्नती मिळाली नव्हती. आयएएस पदोन्नतीच्या यादीत प्रथम क्रमांकाचे नाव असतानाही अनफिट दाखवून जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना डावलले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले होते. याबाबतचे सविस्तर वृत्त जेष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे यांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या अन्यायाबाबत वायचळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. माहितीच्या अधिकारात माहिती घेतल्यानंतर सप्टेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने राज्यातील २३ अधिकाºयांची आयएएसच्या दर्जावर पदोन्नती केली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१८ या कालावधीत रिक्त झालेल्या भारतीय प्रशासन सेवा (महाराष्ट्र राज्य संवर्ग) या पदावर या अधिक़ाºयांची पदोन्नतीने निवड केल्याचे भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी उत्तर दिले. यादीत नाव न आल्याने वायचळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. पण तोवर गोवर्धन दिकोंडा व रामचद्र उबाळे यांनी माहितीच्या अधिकारात या पदोन्नती कशा झाल्या याची युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे माहिती मागितली. १४ सप्टेंबर रोजी युपीसीचे सचिव जी. सी. शहा यांनी दिलेल्या माहितीमध्ये धक्कादायक बाब उघड झाली होती. महाराष्ट्र शासनाने शिफारस केलेल्या नावांमधून समितीचे अध्यक्ष भारत व्यास यांच्या चार सदस्यीय समितीने ७ आॅगस्ट रोजी बैठक घेऊन पदोन्नतीचे नावे अंतिम केली. या समितीकडे आलेल्या नावांमध्ये पहिले नाव सोलापूर झेडपीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांचे होते. त्यांच्या नावापुढे अनफिट असा शेरा मारून पदोन्नती नाकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होऊन वायचळ यांच्यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाल्यावर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. वायचळ यांना 2020 च्या यादीतील आयएएस ग्राह्य धरण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या केलेल्या सेवेचे परीक्षण करून अहवाल सादर केल्यावर भारतीय प्रशासक सेवेने त्यांना 1994 चे आयएएस अधिकारी म्हणून पदोन्नती मान्य केली आहे. ते निवृत्त झाले असले तरी न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्यांना उद्योग विभागाचे उप आयुक्त या पदावर पुन्हा संधी देण्यात आली फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यांना या पदावर संधी मिळाली आहे. पत्रकार सारोळे यांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीची न्यायालयाने दखल घेतली हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्योग उपायुक्त वायचळ यांनी सारोळे यांना सोमवारी मुंबईत बोलावून त्यांच्या वाढदिनी सन्मान केला. याप्रसंगी नवराष्ट्रचे जिल्हा परिषदेत प्रतिनिधी शेखर गोतसुर्वे उपस्थित होते. यावेळी बोलताना वायचळ यांनी सोलापूरच्या पत्रकारितेचा गौरवपूर्ण उल्लेख केला तसेच शासनाच्या मेक इन इंडिया योजनेतून सोलापुरात लघु उद्योजकांना मोठी संधी असल्याचे सांगितले.
सुशीलकुमार शिंदे यांनी केले कौतुक…
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जेष्ठ पत्रकार राजकुमार सारोळे यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले. याप्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनीही सारोळे यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.