अक्कलकोटच्या ‘त्या” 10 मुख्याध्यापकांचे स्वप्न अखेर भंगले
'सोलापूर समाचार"च्या वृत्तांनंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी जारी केले पदभार सोडण्याचे परिपत्रक

सोलापूर : निवृत्तीपर्यंत प्रभारी केंद्रप्रमुख पदावर राहण्याचे अक्कलकोट तालुक्यातील 10 जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांचे स्वप्न अखेर भंगले आहे. ‘सोलापूर समाचार“च्या वृत्तानंतर गटशिक्षणाधिकारी परमेश्वर आरबळे यांनी ‘त्या” मुख्याध्यापकांना पदभार सोडण्याचे परिपत्रक जारी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरिल केंद्रप्रमुखांची बरीच पदे रिक्त होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. शिक्षकांमधून पदोन्नतीने केंद्रप्रमुखाची पदे भरावीत अशी प्राथमिक शिक्षक संघटनांनी मागणी लावून धरली होती. याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतली. सेवा जेष्ठता यादी तयार करून 60 शिक्षकांना गेल्या महिन्यात केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली. समायोजनाद्वारे या नवीन केंद्रप्रमुखांना नियुक्त्या देण्यात आल्या. पण ह्या नियुक्त्या देताना शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार जाऊ नये याची काळजी घेतल्याचे दिसून आले होते. याबाबत ‘सोलापूर समाचार” ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सीईओ आव्हाळे यांनी याची दखल घेतली. त्यामुळे अशा मुख्याध्यापकांकडे असलेला पदभार नव्याने केंद्रप्रमुख झालेल्यांना देण्यात यावा अशी सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी मिरकले यांनी पाच डिसेंबर रोजी आदेश जारी केले होते. मुख्याध्यापकांकडे असलेला केंद्रप्रमुखांचा अतिरिक्त पदभार तात्काळ नव्याने पदोन्नती झालेल्यांना द्यावा असे आदेश देण्यात आले असताना अक्कलकोट तालुक्यातील मुख्याध्यापकांनी मात्र पदभार सोडण्यास नकार दिला होता. आहेत. अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाच कोलदांडा लावल्याचे वृत्त ‘सोलापूर समाचार” ने प्रसिद्ध केल्यावर गटशिक्षणाधिकारी परमेश्वर आरबळे यांनी अखेर 18 डिसेंबर रोजी त्या 10 मुख्याध्यापकांना तात्काळ पदभार सोडण्याचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे आता शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
हे आहेत ते 10 मुख्याध्यापक