सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती

सोयाबीन, बाजरी, मकाच्या नुकसानीबाबत विमा कंपनीचा अहवाल

सोलापूर : खरीप हंगाम प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे पिक विमा भरला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीकडे सादर केलेल्या अहवालानुसार खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना काढलेल्या सर्व पिकासाठी 25 टक्के अग्रीम तात्काळ द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम 2023 प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर तांबडे, शेतकरी प्रतिनिधी सुनील काशीद, उदय नानजकर, तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी दीक्षित, केतकी सिंदेकर पुणे येथून ऑनलाइन द्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या सर्व पिकांसाठी 6 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 6 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर 2023 अशा चार अधिसूचना कंपनीकडे सादर केलेल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात अत्यंत कमी पाऊस झालेला असल्याने शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून वेळेत भरपाई रक्कम मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी प्रीमियम भरलेला असून या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ 25% नुकसान भरपाई अग्रीम द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. 23 ऑक्टोबर पर्यंत स्कायमेटचा डेटा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी चेक करून ही कार्यवाही पूर्ण करावी असेही त्यांनी निर्देशित केले.

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांना 25 टक्के विमा भरपाई देण्याबाबत खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना काढलेल्या सर्व पिकासाठी स्कायमेटचा डेटा तपासणीबाबत खूपच संथ गतीने काम करत असल्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नाराजी व्यक्त करून कंपनीच्या प्रतिनिधींनी स्कायमेटचा ऑनलाईन डेटा तात्काळ चेक करावा. व शेतकऱ्यांना वेळेत विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी सकारात्मकता दाखवावी, असे निर्देश दिले. तसेच कांदा व कापूस पिकाबाबतही अशीच कार्यवाही कंपनीने करावी असे त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सुचित केले की, जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झालेला असून यावर्षी 50 टक्के पेक्षा कमी रब्बी पेरणी होईल. तसेच ऊसाचे क्षेत्रही कमी होणार असून सध्याची परिस्थिती दुष्काळाची असून कंपनीने सोयाबीन, बाजरी व मका पीकाबाबतची विम्याची रक्कम तात्काळ मंजूर करून शेतकऱ्याना वितरित करण्याची मागणी केली. शेतकरी प्रतिनिधी सुनील काशीद व उदय नानजकर यांनीही विमा कंपनीने तात्काळ विमा भरपाई रक्कम देण्याची मागणी केली.

विमा कंपनीचे प्रतिनिधी दीक्षित यांनी सोयाबीन, मका व बाजरी याबाबत कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सकारात्मक अहवाल पाठवलेला असून त्याबाबत स्कायमेटच्या अहवालाची तपासणी कंपनीकडून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येईल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button