बापरे..! झेडपीत एकाच दिवशी होणार 281 जण निवृत्त
सीईओ आव्हाळे यांच्यासह तिन्ही महिला अधिकाऱ्यांनी दाखवली आपल्या कार्याची चुणूक

सोलापूर : जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयातील विविध विभागांची सेवा करून 31 मे रोजी 281 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. यासाठी झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या मदतीने सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी सुट्टीतही विशेष कॅम्प लावला आहे.
एक जून ही जुनी सरकारी जन्मतारीख अद्यापपर्यंत अनेकांच्या माथी आहे. सरकारी सेवेत कार्यरत असलेले असे अनेक जण 31 मे रोजी सेवानिवृत्त होताना दिसत आहेत. त्यामुळे दरवर्षी विविध सरकारी कार्यालयाच्या विभागात या तारखे दिवशी निवृत्त होणाऱ्यांची संख्या मोठी असते. जिल्हा परिषदेत 31 मे रोजी असे विविध विभागातील सुमारे 281 कर्मचारी एकाच वेळी निवृत्त होत आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी त्यांच्या सेवेचे सर्व लाभ द्यावेत, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी वित्त विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन 31 मे रोजी सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा लाभ मिळवून देण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे वित्त विभागाच्या मुख्य लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी सुट्टीच्या काळात निवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा लाभ देण्यासाठी विशेष कॅम्प लावला आहे. झेडपीतील या तीन महिला अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना असा सुखद धक्का दिला आहे. दरवर्षी असे अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होतात पण नंतर त्यांना पेन्शनसाठी हेलपाटे घालावे लागतात. ही समस्या ओळखून सीईओ आव्हाळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.