जूनमध्ये होणार निरक्षरांची प्रवेश प्रक्रिया

सोलापूर : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत जिल्ह्यात राहिलेल्या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी जूनमध्ये उल्हास ॲपवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती योजनेच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी दिली.
नवभारत साक्षरता अभियानांतर्गत जिल्हह्यातील १७ हजार ८५३ जणांनी उल्लास अॅपवर नोंदणी केली होती. या सर्वांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी ४२१ नवसाक्षर परीक्षेसाठी गैरहजर राहिले, तर उर्वरित परीक्षार्थींपैकी १७ हजार ४३२ नवसाक्षर उत्तीर्ण झाल्याने ९७.६४ टक्के निकाल लागला आहे. त्यातील अनुत्तीर्ण २१६ व गैरहजर ४२१ नवसाक्षरांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. जिल्ह्यात १७ मार्च रोजी यासाठी १५० गुणांचा पेपर घेण्यात आला होता. त्यात उत्तीर्णसाठी ५१ गुण होते. यासाठी ग्रेस गुणही दिले आहेत. अनुत्तीर्ण नवसाक्षरांसाठी पुन्हा सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. उत्तीर्ण नवसाक्षरांना लवकरच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नवभारत साक्षरता अभियानात नवसाक्षरांनी शिकविण्यासाठी स्वयंसेवकांचीही नोंदणी झाली होती. सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात साक्षरतेचे वर्ग सुरू केले होते. या वर्गात शिकलेल्या सर्व नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली होती. नवसाक्षरांनी ज्या शाळेतून नोंदणी केली होती, तीच शाळा परीक्षा केंद्र होते. संबंधित शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक हे केंद्र संचालक होते.
केंद्र सरकारने २०२७ पर्यंत १०० टक्के नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सरकारने जिल्हानिहाय असाक्षर नोंदणीचे उद्दिष्ट दिले होते. त्यासाठी जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर नोंदणी केलेल्या असाक्षरांसाठी शिवणी वर्ग चालविण्यात येऊन परीक्षा घेण्यात आली होती. यात नोंदणी महिलांची संख्या १२ हजार ९०४ इतकी होती. त्यापैकी १३ हजार ५१ महिलांनी परीक्षा दिली. त्यापैकी उत्तीर्ण झालेल्यांचे शेकडा प्रमाण ९७ टक्के आहे.
जिल्ह्यासाठी १७ हजार ८५३ चे उद्दिष्ट होते. तेवढ्या नवसाक्षरांनी नोंदणी केली होती. आता उरलेल्या निरक्षरांची जूनपासून उल्हास ॲपवर नोंदणी घेऊन वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सुलभा वठारे यांनी सांगितले.