भाडेकरू झाले कलेक्टर, घर मालकाने फोडले फटाके
दिलीप स्वामी यांचा सोलापुरातील असाही योगायोग

सोलापूर : भाडेकरू व घर मालकाचे नाते वेगळेच असते. आपल्या घरातून भाडेकरूचं चांगलं झालं की घरमालकाला आनंद होतोच. असाच किस्सा सोलापुरातील आहे. दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर झाले आणि त्यांच्या घरमालकाने फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची 20 जून रोजी बदली झाली पण त्यांना पुढील पोस्टिंग मिळाली नव्हती. त्यामुळे ते सरकारी निवासस्थानातच राहत होते. यादरम्यान त्यांनी नवीन पोस्टिंगसाठी मुंबईला अनेक हेलपाटे घातले. तीन महिने झाल्यानंतर त्यांना सरकारी निवासस्थान सोडावे लागले. त्यामुळे ते अंत्रोळीकरनगर क्रमांक दोन मधील हंद्राळे यांच्या घरी भाड्याने राहावयास आले. या ठिकाणी त्यांनी जवळपास चार महिने निवास केला. यादरम्यानच त्यांना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग मिळाली. स्वामी जिल्हाधिकारी झाल्याचे कळताच घरमालक हंद्राळे यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. त्यामुळे अंत्रोळीकरनगरात हा चर्चेचा विषय झाला. दिलीप स्वामी हे कलेक्टर झाल्याची बातमी सर्वांनाच कळाली.
हंद्राळे हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. सेवेत असताना त्यांनी सोलापुरात अंत्रोळीकरनगरात घर घेतले. मूळचे संभाजीनगरचे असल्याने निवृत्तीनंतर ते तिथे राहाव्यास गेले. त्यामुळे त्यांचे घर रिकामेच होते. स्वामी यांनी या घरात आपले कुटुंब हलवले. त्यामुळे हंद्राळे व स्वामी यांचे घरमालक व भाडेकरू असे नाते निर्माण झाले. जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम केल्यानंतर कलेक्टरपदी बढती मिळते असा आजपर्यंतच्या सोलापूर जिल्हा परिषदेचा अनुभव आहे. परंतु स्वामी यांना पोस्टिंग न मिळाल्याने वेगवेगळी चर्चा रंगली होती. त्यांना रत्नागिरी, कोल्हापूरची पोस्टिंग मिळणार अशी ही चर्चा रंगली होती. अशातच स्वामी यांची कलेक्टर म्हणून संभाजीनगरला पोस्टिंग झाल्याचे समजताच हंद्राळे यांनी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अभिनंदन केले. भाडेकरूची प्रगती व घर मालकाचा आनंद यातून हे नाते आणखीनच दृढ झाल्याचे दिसून येते. आपण घरमालक व भाडेकरूची अनेक उदाहरणे पाहिली व ऐकली असतील. काही ठिकाणी वाद तर काही ठिकाणी घरमालक भाडेकरूलाच घर विकत देतो तर काही ठिकाणी भाडेकरू नवीन घर घेऊन राहण्यासाठी निघतो त्यावेळेला घर मालक त्याचा सन्मान करतो असे अनेक किस्से पाहण्यात आले असतील. माझ्या घरातून भाडेकरूची चांगली प्रगती झाली याचे घरमालकाला मोठे समााधान असते, अशीच काहीशी भावना त्यातून दिसून येते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दिलीप स्वामी यांनी सोलापुरात चांगले काम केले. ग्रामीण भागातील जनतेला चांगले शिक्षण व आरोग्य मिळावे म्हणून अनेक नवीन प्रयोग त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रात नाव झाले. यातून सोलापूरकरांशी त्यांचे एक वेगळे नाते निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्या येथील कार्यकालातील बऱ्याच घटनांचे सोलापूरकर साक्षीदार आहेत. ते कलेक्टर झाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.