
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेच्या मुख्याध्यापकाने पदरमोड करीत व शिक्षण समितीच्या सहकार्याने शाळेतील मुलींना ब्रँडेड कंपनीच्या कापडाचा गणवेश व दर्जेदार कंपनीचा बूट उपलब्ध करून दिला आहे.
जिल्हा परिषद मैंदर्गी कन्नड मुली शाळेत एकूण 258 पटसंख्या असून त्या सर्व मुलींना शासनाकडून एक जोड बूट दोन जोड सॉक्ससाठी पैसे मंजूर झाले होते. पहिली ते सातवीतील प्रत्येक विद्यार्थिनींना 170 रुपयाप्रमाणे एक जोड बूट व दोन जोड सॉक्ससाठी 43 हजार 690 रुपये मंजूर झाले होते. परंतु 170 रुपयांमध्ये एक जोड बूट दोन जोड सॉक्स उत्तम दर्जाचे खरेदी होत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने त्याचा विचार करून लोकवर्गणी गोळा केली. त्या लोकवर्गणीतून पहिली ते सातवी मुलीना 279 रुपयापासून 379 रुपये पर्यंतचे बूट खरेदी करण्यात आले. मैंदर्गी गावचे प्रतिष्ठित नागरिक माजी नगराध्यक्ष तुकप्पा नागोर आणि शिक्षण विस्तार अधिकारी दयानंद कवडे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पाटील, मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या उपस्थितीत मुलींना बूट व सॉक्स वाटप करण्यात आले. उत्तम दर्जाचे बूट दिल्याने मुलीमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मुलींना चांगल्या कंपनीचे बुट उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तुकप्पा नागोर यांनी शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी उत्तम रीतीने कामकाज करीत आहेत शासनाने गणवेशासाठी मंजूर केलेल्या निधीपेक्षा पदर मोड करून ब्रॅण्डेड कंपनीचा गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिक्षण विस्तार अधिकारी दयानंद कवडे यांनी मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्या कामाला तोड नाही असे कौतुक केले. आभार व्यक्त करताना मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी यंदाही मुलींना विमान सफर करणार असल्याचे सांगितले.