अक्कलकोट तालुक्यात होत आहे सहा इंडिकेटरवर काम
पंचायत समितीच्या कार्यक्रमाला जमले इतके लोक

सोलापूर : पंचायत समिती अक्कलकोट यांच्यावतीने आकांक्षित तालुका अक्कलकोट येथे नीती आयोगाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 जुलै ते 30सप्टेंबर या कालावधीत सुरू झालेल्या संपूर्णता अभियानाचे उद्घाटन शुक्रवारी सातशे ते आठशे लोकांच्या उपस्थितीत आणि नीती आयोगाच्या प्रतिनिधी श्रीमती सायली माणकिकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
निती आयोगामार्फत सुरू असणाऱ्या आकांक्षीत तालुका या योजनेत एकूण 40 इंडिकेटरवरती काम चालू आहे. या 40 इंडिकेटर पैकी एकूण सहा इंडिकेटरचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी संपूर्णतः अभियान सुरू करण्यात आलेले आहे .या अभियानांतर्गत तालुक्यातील गरोदर महिला नोंदणी,बीपी, हायपर टेन्शन, मधुमेह यांची तपासणी,गरोदर महिलांना सकस आहार देणेविषयी जागृती, महिला बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे आणि कृषी विभागअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जमिनीची मृदा तपासणी करून हेल्थ कार्ड तयार करणे हा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये मंगरूळे हायस्कूलचे बँड पथक व एनसीसी विद्यार्थी,सरपंच, ग्रामसेवक, आशा,अंगणवाडी सेविका,सीआरपी,पंचायत समिती कर्मचारी, कृषी सहाय्यक यांनी सहभाग घेतला होता
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी केले. सहा इंडिकेटरबाबत माहिती तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे,अंगणवाडी पर्यवेक्षिका शुभदा जेऊरकर, वैद्यकीय अधिकारी सुरेखा बिराजदार यांनी दिली. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांना नीती आयोगाच्या प्रतिनिधी सायली माणकिकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये गरोदर महिलांच्या पोषणविषयक जागृतीसाठी पथनाट्याचे सादरीकरण महिला कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले. तसेच सहा इंडिकेटरची माहिती देण्यासाठी सहा स्टॉलची उभारणी करण्यात आलेली होती व आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन नीती आयोगाच्या प्रतिनिधी माणकीकर यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख,तालुक्याच्या फेलो प्रीती रोकडे, तसेच सांगोला तालुक्याच्या फेलो अनुजा गावडे, तसेच निकिता गायकवाड उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी केले व आभार कृषी अधिकारी सचिन चव्हाण यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.