सोलापूर जिल्ह्यात 19 हजार निरक्षरांची नोंद
1232 केंद्रावर होणार आजी- आजोबांची परीक्षा

सोलापूर : जिल्ह्यात 19 हजार 28 निरक्षरांची ऑनलाईन नोंद झाली असून यातील आजी- आजोबांची 17 मार्च रोजी 1232 केंद्रावर परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती योजना विभागाचे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी दिली.
केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दिनांक 17 मार्च रोजी होणार आहे. सोलापूर जिल्ह्य़ात आतापर्यंत 19 हजार 28 इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी झाली असून त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान ५ लाखाहून अधिक नवसाक्षर ही परीक्षा देतील असा अंदाज आहे. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन,लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण इ. बाबींचा समावेश आहे. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हा प्रयोग करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेतली जाणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. नोंदणीकृत असक्षरांनी रविवार दिनांक १७ मार्च रोजी त्या शाळेमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. तसेच नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन योजनाचे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी केले आहे.
अशी आहे निरक्षरांची संख्या…
अक्कलकोट ४९६७
बार्शी 951
करमाळा 2337
माढा 1544
माळशिरस 150
मंगळवेढा 519
मोहोळ 498
पंढरपूर 60
सांगोला १२४
उत्तर सोलापूर 399
दक्षिण सोलापूर 2341
सोलापूर शहर: एक 2883
सोलापूर शहर: दोन 1777
ब्लॉक 478