सोलापूरराजकीय

सोलापूर झेडपी, मार्केट कमिटी, डीसीसी बँक निवडणूक कधी?

लोकसभा निवडणूक निकालानंतरही भाजपला जाग नसल्याचा आरोप

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत राज्यभर दारुण पराभव झालेल्या भाजपच्या नेत्यांना अजून जाग आलेली दिसत नाही. सोलापूर डीसीसी बँक, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद व पंचायत समिती, महापालिका प्रशासकांना बेकायदेशीर मुदतवाढ देऊन भाजप सरकार कोणता कायदा चालवत आहे? असा आरोप सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाचा जनतेने दारुण पराभव केला. भाजपच्या हुकूमशाहीला जनताच कंटाळले आहे त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून हे अद्याप भाजपच्या नेत्यांना जाग आलेली दिसत नाही. सोलापूर मार्केट कमिटी डीसीसी बँकेच्या प्रशासकाला आणखी मुदत किती वेळा देणार असा सवाल जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी केला आहे. कायद्यातील तरतूद डावलून हम करे सो कायदा असा कारभार भाजपच्या नेत्यांनी सुरू केला आहे. लोकसभा निवडणुका असताना देखील दि .१२ मे रोजी तुमसर जि .भंडारा बाजार समितीची निवडणुक झाली आहे. डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी 180 दिवस अगोदर प्रोग्राम सुरु करायचे असताना देखील डीडीआरनी प्राधिकरणाने पत्र देऊनही मतदार यादीचे काम चालू केलेले नाही.
सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्यातील मार्केट कमिटीचा प्रोग्राम सुरु करण्यात आला असून मतदार यादी स्वीकारली आहे. पण सोलापूर मार्केट कमिटीला मात्र  भाजपाचे आमदार सभापती असल्याकारणाने मुदतवाढ देण्यात आले असल्याचा आरोप हसापुरे यांनी केला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्य़ातील साखर कारखाने, सूत मिल,  ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये मकाई कारखाना, सहकार शिरोमणी या कारखान्याचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे पण सोलापूर मार्केट कमिटीलाच मुदतवाढ का देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील कंधार, इस्लापूर, मुखेडसह अन्य बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सप्टेंबर व ऑक्टोंबरमधे सुरु आहे. पण पावसाचे कारण सांगून फक्त सोलापूर मार्केट कमिटीचे निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, डीसीसी बँकनाही बेकायदेशीर मुदत वाढ देण्यात आली आहे. प्रशासकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार ठप्प झाला आहे. पणन मंडळाच्या नियमानुसार निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यासाठी सोलापूर मार्केट कमिटीने  दहा लाख निवडणूक खर्च जमा केला आहे.  पण हे निवडणूक टाळण्याचे कारण काय असा सवाल असा हसापुरे यांनी उपस्थित केला आहे. भाजपने कितीही बेकायदेशीर कामे करू देत, जनता याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आता तरी भाजपच्या नेत्यांनी जागे व्हावे, असा टोला त्यांनी मारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button