झेडपीच्या आरोग्य विभागात घडली लाजिरवाणी गोष्ट
सीएमओ कार्यालयाच्या तंबीनंतर सुरू झाली चौकशी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एक लाजिरवाणी घटना घडली आहे. पण विभाग प्रमुखांनी याची दखल न घेतल्याने मंत्रालयातून तंबी दिल्यानंतर या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नव्याने अनेक कर्मचारी रुजू होत आहेत. यातील एका महिला कर्मचाऱ्याला अक्कलकोट तालुक्यात नेमणूक देण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्याला वाईट अनुभव आला. ही गंभीर बाब त्यांनी विभाग प्रमुखाच्या कानावर घातल्याचे सांगण्यात येत आहे. पण या तक्रारीची दखल न घेता संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांची तक्रार घेऊन संबंधित महिलेची बदली करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे हे प्रकरण मंत्रालयापर्यंत गेले. सीएमो कार्यालयाने तंबी दिल्यावर अखेर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. महिलांच्या गंभीर तक्रारी ऐकून घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात ‘विशाखा” समिती आहे. पण ही समिती काम करते का असा सवाल आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. आपणच खंबीर बनलं पाहिजे आणि संबंधिताला आपला हात दाखवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागातील एका महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
आरोग्य विभागातील 319 कंत्राटी डॉक्टरांना दोन महिन्यापासून पगार मिळाला नसल्याची तक्रार आहे. याबाबत ओरड सुरू झाल्यावर संबंधितांनी एकमेकाकडे बोट करणे सुरू केले आहे. त्यामुळे यावर म्हणणे ऐकून घेण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. संतोष नवले यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता ते बुधवारी दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले.